Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिपरजॉय चक्रीवादळ: आज किनारपट्टीला धडकणार, कुठे आणि कसे परिणाम दिसणार

Cyclone Biperjoy
, गुरूवार, 15 जून 2023 (08:36 IST)
ANI
अरबी समुद्रात निर्माण झालेलं बिपरजॉय हे चक्रीवादळ आज (15 जून) संध्याकाळपर्यंत गुजरातमधील मांडवी, जाखौ किनारा तसंच पाकिस्तानातील कराची किनारपट्टीजवळ धडकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे.
 
हे वादळ 120-130 ते 145 किमी प्रतितास वेगाने किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.
 
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतिशय तीव्र स्वरुपाचे असलेले चक्रीवादळ बिपरजॉय अरबी समुद्रातून ईशान्येकडे जात असून त्यामुळे सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीला ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
 
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी बुधवारी (14 जून) बिपरजॉय संदर्भात पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली. 
 
त्यांनी म्हटलं, “चक्रीवादळाबाबत हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजात कोणताही बदल झालेला नाही. चक्रीवादळ त्याच मार्गाने पुढे सरकत आहे आणि 15 जूनला कच्छमधील जाखौ बंदराजवळ संध्याकाळी 4 ते रात्री 8 या वेळेत धडकण्याची शक्यता आहे.”
 
हवामान विभागाच्या अहमदाबाद विभागाचे संचालक मनोरमा मोहंती यांनीही वादळाच्या परिणामांची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, "वादळानंतर कच्छ, देवभूमी द्वारका आणि जामनगरमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहू शकतात."
 
मृत्युंजय महापात्रा यांनी म्हटलं, "गुजरातच्या किनारी भागात वेगाने वारे वाहतील, परंतु कच्छ जिल्ह्यात सर्वाधिक वारे वाहतील."
 
14 जून रोजी संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत चक्रीवादळ जाखौ बंदरापासून 240 किमी अंतरावर, देवभूमी द्वारकापासून 260 किमी अंतरावर, नलियाच्या 260 किमी अंतरावर, पोरबंदरच्या 310 किमी अंतरावर तर कराचीपासून 330 किमी अंतरावर होते.
 
सरकारने काय तयारी केली आहे?
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, केंद्रीय गृह मंत्रालय 24 तास परिस्थितीचा आढावा घेत आहे.
केंद्र सरकार या प्रकरणी राज्य सरकार आणि संबंधित केंद्रीय यंत्रणांच्या संपर्कात आहे.
NDRF ने वादळाचा सर्वाधिक धोका असलेल्या भागांमध्ये 12 टीम तैनात केल्या आहेत.
मदत, शोध आणि बचाव कार्यासाठी भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाने जहाजे आणि हेलिकॉप्टर तैनात केले आहेत.
विमानं आणि हेलिकॉप्टर किनाऱ्यावर लक्ष ठेवून आहेत.
लष्कर, एअर फोर्स आणि इंजिनिअर टास्क फोर्स युनिट्स बोटी आणि बचाव उपकरणांसह स्टँड बायवर आहेत.
लष्कर, नौदल आणि तटरक्षक दलाची आपत्ती निवारण पथके आणि वैद्यकीय पथकेही मदतीसाठी सज्ज आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, गुजरातमध्ये मुख्यमंत्री स्तरावर जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेण्यात आली असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संपूर्ण राज्य प्रशासन सज्ज आहे.
यासोबतच कॅबिनेट सचिव आणि गृह सचिव हे गुजरातचे मुख्य सचिव आणि संबंधित केंद्रीय मंत्रालये, एजन्सी यांच्या सतत संपर्कात आहेत.
या वादळाचा सामना करण्यासाठी गुजरात सरकारने केलेल्या उपाययोजनांचीही पंतप्रधानांना माहिती देण्यात आली आहे. या बैठकीला गृहमंत्री, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बिपरजॉय चक्रीवादळ इतका काळ कसं टिकलं?
6 जून 2023. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं. पुढच्या काही तासांतच बिपरजॉय चक्रीवादळाची निर्मिती झाली.
 
7 जून 2023 चा दिवस संपण्यापूर्वी आधी सीव्हियर सायक्लोन म्हणजे तीव्र चक्रीवादळ आणि मग व्हेरी सिव्हियर सायक्लोन म्हणजे अतीतीव्र चक्रीवादळ अशी बिपरजॉयची तीव्रता वाढत गेली.
 
अवघ्या चोवीस तासांत ज्या वेगानं हे चक्रीवादळ तयार झालं, ते अगदी थक्क करणारं आहे. इतकंच नाही तर या चक्रीवादळानं आपली ताकदही बरेच दिवस टिकवून ठेवली.
 
6 जूनला हे चक्रीवादळ तयार झालं होतं आणि 15 जूनला ते किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. म्हणजे जवळपास दहा दिवस या वादळाची ताकद टिकून राहिली, असं म्हणता येईल.
 
पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी अर्थात आयआयटीएमच्या 2021 सालच्या अहवालानुसार उत्तर हिंदी महासागरात म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात येणाऱ्या चक्रीवादळांचा कालावधी गेल्या चाळीस वर्षांत 80 टक्के वाढला आहे. तसंच अतीतीव्र चक्रीवादळांचा कालावाधी 260 टक्क्यांनी वाढला असल्याचंही हा अहवाल सांगतो.
 
समुद्राच्या एखाद्या भागात तापमान वाढलं की तिथली हवा वर सरकते आणि तिथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो, त्यातूनच चक्रीवादळाची निर्मिती होते.
 
म्हणजेच समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान जेवढं जास्त तेवढी वादळाला मिळणारी ऊर्जा जास्त असते आणि त्यातूनच वादळ ताकदवान बनतं, जास्त दिवस टिकून राहतं आणि जास्त अंतर पार करू शकतं.
 
याउलट चक्रीवादळ जमिनीला धडकतं किंवा थंड पाण्याच्या प्रदेशात सरकतं, तेव्हा त्याला मिळणारी ऊर्जा कमी होते आणि ते विरून जातं.
 
गेल्या काही दशकांत अरबी समुद्राचं तापमान सातत्यानं वाढत असल्याचं भारतीय हवामान विभागाच्या 2019 सालच्या अहवालात म्हटलं होतं. 1981-2010 च्या तुलनेत गेल्या 2019 साली अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान 0.36 अंश सेल्सियसनं वाढल्याचं हा अहवाल सांगतो. जागतिक तापमानवाढीमुळे हे होत असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
 
म्हणजेच आपण करत असलेल्या कार्बन उत्सर्जनाशी बिपरजॉय सारख्या चक्रीवादळांच्या तीव्रतेचा थेट संबंध आहे.
Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जाहिराती, तुलना, टाळाटाळ, आणि दावेप्रतिदावे : शिंदे-फडणवीस सरकारमधल्या या घटनाक्रमाचा अर्थ काय? दीपाली जगताप