उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यात सरकारी रुग्णालयात डॉक्टरांचा निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या सरकारी रुग्णालयात डॉक्टरांनी एका 18 वर्षीय तरुणीच्या डोक्यावर शस्त्रक्रिया केली असून डॉक्टरांनी तिला टाके लावल्यावर सर्जिकल सुई डोक्यातच सोडली. घरी आल्यावर मुलीला वेदना होऊ लागल्या नंतर कुटुंबीयांनी तिला एका खासगी रुग्णालयात नेले असून जखम उघडल्यावर डॉक्टरांना धक्काच बसला.
मुलीच्या डोक्यात डॉक्टरांना सर्जिकल सुई आढळली. सुई काढण्यात आली असून आता मुलीला दुखण्यापासून सुटका झाली आहे. मुलीला डॉक्टरने टाके घातले त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे.
मुलीचे शेजाऱ्यांशी भांडण झाल्यावर तिच्या डोक्यात जखमा झाल्या होत्या. तिला सामुदायिक आरोग्य केंद्रावर नेण्यात आले असता डॉक्टरने तिला टाके घालताना डोक्यात सर्जिकल सुई सोडली.डॉक्टरने हे काम दारूच्या नशेत केले असून मुलीच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली आहे.
तर घडलेल्या प्रकाराची माहिती सामुदायिक आरोग्य केंद्राकडे असून प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन सदस्यीय पथके तयार करण्यात आली असून पथकाने अहवाल सादर केल्यावर त्यानुसार कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. डॉक्टर टाके घालताना दारूच्या नशेत नसल्याचे ते म्हणाले.