यंदाही पाणीटंचाई आणि दुष्काळ सदृश परिस्थिती कायम असून देशातील १५३ जिल्हे दुष्काळग्रस्त असल्याचा अहवाल हवामान खात्याने दिला आहे. ऑक्टोबर २०१७ पासून ते मार्च २०१८पर्यंतच्या विविध राज्यांमधील पाण्याच्या स्थितीचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. यात ४०४ जिल्ह्यांचा समावेश होता. या सर्वेक्षणानंतर १५३ जिल्हे हे अतिशय कोरडे आणि दुष्काळ सदृश जिल्हे असल्याचं समोर आलं आहे. तर त्या तुलनेने १०९ जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाची तर १५६ जिल्ह्यांत कमी स्वरूपाची पाणीटंचाई असणार आहे.
गेल्या वर्षी ६३ टक्केच पाऊस झाल्याने आणि वाढत्या उन्हामुळे नद्यांची पातळी आटल्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य असणार आहे. यात प्रामुख्याने उत्तर, मध्य आणि पश्चिम हिंदुस्थानातील राज्यांचा समावेश आहे. त्यातही पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान अशा राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्या सगळ्या जिल्ह्यांच्या जिल्हा प्रशासनाकडे हे पाणीसंकट टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची जबाबदारी पडणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.