नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानच्या विविध भागात मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भारताची राजधानी दिल्ली आणि त्याच्या लगतच्या एनसीआर भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे हे धक्के बराच वेळ जाणवत होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.4 एवढी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत भारत किंवा पाकिस्तानच्या कोणत्याही भागाला भूकंपामुळे कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता 5.4 इतकी नोंदवली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू डोडामध्ये भूपृष्ठापासून ६ किमी खाली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलपासून 158 किमी, हिमाचल प्रदेशातील मनालीपासून 163 किमी अंतरावर आहे. या भूकंपाचा प्रभाव भारताच्या सीमावर्ती भागाला जोडलेल्या पाकिस्तानच्या अनेक भागातही दिसून आला. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी मोजण्यात आली आहे.
1:33 वाजता भूकंप झाला
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, मंगळवारी दुपारी 1:33 वाजता भूकंप झाला आणि त्याचे धक्के सुमारे 30 सेकंद जाणवले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये काम करणाऱ्या अनेकांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याबद्दल सांगितले. भूकंपाचे धक्के बराच वेळ जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमधील एका स्थानिक नागरिकाने सांगितले की, हा भूकंप झाला तेव्हा मुले शाळेत होती आणि भूकंपाच्या धक्क्याने ते घाबरले. लोक दुकानातून बाहेर आले. ते खूप भीतीदायक होते. त्यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते, मात्र यावेळीही भूकंपाचे धक्के जास्त होते.