हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीच्या कार्यालयात एका अभियंता तरुणीचा मृतदेह आढळला आहे. कॉम्प्युटरच्या केबलने तिचा गळा आवळण्यात आला आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका सुरक्षारक्षकाला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मृतावस्थेत सापडलेल्या तरुणीचे नाव रसीला राजू ओपी आहे. ती हिंजवडीतच राहत होती. तसेच ती मूळची केरळची रहिवासी होती. तरुणी इन्फोसिस कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होती.
हिंजवडीच्या फेज २ मध्ये असलेल्या इन्फोसिसच्या कार्यालयात रविवारी रात्री उशिरा रसीलाचा मृतदेह आढळला. तिचा कंपनीमध्येच कॉम्प्युटर केबलच्या सहाय्याने गळा आवळण्यात आला आहे. पोलिसांना ही घटना कळताच तातडीने तेथे धाव घेऊन कंपनीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यात एका सुरक्षारक्षकाच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. तसेच तो कंपनीतून पसार झाला होता. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून सुरक्षारक्षकाला मुंबईत जेरबंद केले आहे. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.