Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सप्तपदी सुरू असताना घरात अग्नितांडव, 14 जणांचा मृत्यू, नवरीपासून बातमी लपवली कारण...

सप्तपदी सुरू असताना घरात अग्नितांडव, 14 जणांचा मृत्यू, नवरीपासून बातमी लपवली कारण...
, शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 (19:53 IST)
"माझे वडील आणि बायकोचा मृत्यू झाला, बायकोला मी मुखाग्नी देऊ की माझा मुलगा?"हा प्रश्न विचारताना धनबादच्या आशीर्वाद टॉवरमध्ये राहणारे सुबोध लाल यांच्या डोळ्यात अश्रू होते. सुबोध लाल यांच्या आजूबाजूला उपस्थित असलेल्या मित्रांपैकी विनोद अग्रवाल यांनी त्यांचं सांत्वन करताना म्हटलं की, मुलगाच आईला अग्नी देत असतो.
 
हे ऐकून सुबोध थरथरत्या आवाजात एवढंच बोलू शकले की, "इथं काल रात्री एकीकडे मुलीचा लग्नसोहळा होता आणि दुसरीकडे मी माझी पत्नी, वडीलां आणि इतर 12 नातेवाईकांना कायमचं गमावलं."
 
मंगळवारी धनबादच्या आशीर्वाद टॉवरला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत सुबोध लाल यांनी त्यांचे अनेक नातेवाईक गमावले आहेत.
 
आशीर्वाद टॉवरमध्ये एकूण 68 फ्लॅट्स आहेत. आशीर्वाद टॉवरमध्ये A आणि B असे दोन ब्लॉक आहेत.
 
बी टॉवरमधील फ्लॅटमध्ये लागलेली आग वेगानं पसरली आणि या आगीत लग्नासाठी एकत्र जमलेल्या सुबोध यांच्या अनेक नातेवाईकांचा मृत्यू झाला.
 
60 वर्षीय मुकेश अरोरा ए-ब्लॉकमध्ये राहतात. ते सांगतात, "बी-ब्लॉकमध्ये आग लागल्यामुळे ए-ब्लॉकमध्ये राहणारे लोक 15 मिनिटांत बाहेर आले. पण बी-ब्लॉकच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्यामुळे परिस्थिती वेगळी होती."
 
पण दोन्ही ब्लॉकमधील बाहेर पडण्याचे मार्ग वेगवेगळे नसते, तर अनागोंदी आणखी वाढली असती, ज्यामुळे बरंच नुकसान झालं असतं, असं ते सांगतात.
 
सुबोध लाल यांच्या आशीर्वाद टॉवरच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावरील दोन फ्लॅटमध्ये त्यांची पत्नी, आई, वडील आणि इतर नातेवाईक त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या तयारीत होते.
 
सुबोध लाल हे लग्नाच्या कामासाठी बाहेर गेले होते. सव्वा सात वाजता ते आशीर्वाद टॉवरजवळ पोहोचताच दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याने गोंधळ उडाल्याचा त्यांच्या लक्षात आलं.
 
सुबोध लाल यांचे मित्र सिकंदर कुमार साव सांगतात, "आम्ही सर्व मित्र सुबोधची मुलगी स्वाती हिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होतो. पण आगीची बातमी मिळताच मी सव्वा सातच्या सुमारास घटनास्थळी पोहोचलो. आशीर्वाद टॉवरच्या दुसऱ्या मजल्यावरील बी-2 फ्लॅटमधून ज्वाळा निघत असल्याचं मला दिसलं.”
 
ते पुढे सांगतात, "फ्लॅटमधून निघणाऱ्या ज्वाला हळूहळू तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचल्या. अग्निशमन दलाच्या सात गाड्या तिथं पोहोचल्या, मात्र त्यांना आगीवर नियंत्रण मिळवता आलं नाही."
 
ए-ब्लॉकच्या आठव्या मजल्यावर राहणारे मुकेश अरोरा सांगतात, "धनबाद प्रशासन 10 मजल्यापर्यंत इमारतीच्या नकाशाला परवानगी देतं. पण त्यांच्याकडे 50 फूट उंचीपर्यंत पाणी टाकून आग विझवू शकतील, अशी अग्निशमन दलाची वाहनं नाहीत."
 
सुबोध लाल यांचे दुसरे मित्र विनोद अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, अग्निशमन दलाची यंत्रणा पाणी 50 फूट उंचीवर पोहोचण्यात अपयशी ठरली होती.
 
आशीर्वाद टॉवरपासून 100 फूट अंतरावर असलेल्या पाटलीपुत्र मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलनं त्यांच्याकडील अग्निशमन उपकरणं वापरली. या मदतीनं रात्री दहाच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
 
मुकेश अरोरा सांगतात, “आग विझल्यानंतर आम्ही आत गेलो तेव्हा सर्व मृतदेह दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरच्या जिन्यांवर पडलेले होते. धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याचं दिसून येत होतं.”
 
जे लोक वरच्या मजल्यावर गेले नाहीत तेच जखमी झाले आणि त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झाला, असंही ते सांगतात.
 
नवरीला बातमी कळूच दिली नाही...
विनोद अग्रवाल सांगतात, सुबोध लाल यांची आई अजूनही आयसीयूमध्ये आहे. आग आटोक्यात आल्यानंतर वरच्या मजल्यावर गेल्यावर ती पायऱ्यांवर बेशुद्ध अवस्थेत असल्याचं मला दिसलं.
 
मुलीचा लग्नात सहभागी होण्यासाठी जमलेले सुबोध लाल यांचे 12 नातेवाईक या घटनेत मरण पावले आहेत. ते सगळे झारखंडमधील बोकारो, गिरिडीह आणि हजारीबाग जिल्ह्यांतून आले होते.
 
मृतदेहांची ओळख पटल्यानंतर सुबोध लाल यांनी मित्रांच्या सांगण्यावरून मुलगी स्वातीला निरोप दिला.
 
त्यावेळी तेथील वातावरण पूर्णपणे वेगळं होतं. वडील सुबोध डोके टेकवून बसले होते आणि वधू कन्यादान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बसली होती.
स्वातीची पाठवणी करेपर्यंत तिचे आजोबा, आई, काकू वगैरे या जगात राहिले नाहीत, हे तिळा कळू दिलं नाहीत, असं सुबोध यांचे मित्र सांगतात.
 
स्वातीचे वडील सुबोध लाल मंडपाजवळ खुर्चीवर बसले होते. मात्र त्यांना कन्यादान सोहळा पूर्ण करता आला नाही. मग स्वातीच्या भावाने तो विधी पूर्ण केला.
 
विनोद अग्रवाल सांगतात, सुबोध यांच्या मनात मुलीला पत्नीच्या उपस्थितीशिवाय सासरी कसं पाठवायचं, याची घालमेल सुरू होती. यात पहाटेचे पाच वाजले होते.
 
स्वातीची पाठवणी केली गेली. पण, तो आई, आजी, आजोबा, काकू यांच्याशिवाय.
 
ज्या घराला आग लागली ते आता सुरक्षित
दुसऱ्या मजल्यावरील बी-2 फ्लॅटमधून आगीच्या ज्वाला पहिल्यांदा दिसत होत्या, असं प्रत्यक्षदर्शी सांगत होते.
 
या फ्लॅटचे मालक पंकज अग्रवाल एका खाजगी कंपनीत काम करतात. "माझी दोन्ही मुलं, मी आणि पत्नी वाचलो. पण तिघंही घाबरलेले आहोत," असं ते सांगतात.
 
पंकज अग्रवाल सांगतात, "ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी माझी पत्नी स्वयंपाकघरात काम करत होती. त्यावेळी मी माझा आणि मुलीसोबत झोपलो होतो. अचानक मला स्फोटक आवाज ऐकू आला. दुसऱ्या खोलीतील स्वीच बोर्डाला आग लागल्याचं मला दिसलं. मी काही करायच्या आतच आग स्वीच बोर्डाच्या शेजारी असलेल्या छोट्या लाकडी देवळापर्यंत पोहोचली, त्यानंतर ती खिडकीच्या पडद्यांपर्यंत पसरली."
 
ते पुढे सांगतात, "आग वाढत असल्याचं पाहून मी इमारतीत बसवलेल्या अग्निशमन यंत्रानं आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण ते काम करत नव्हतं. तोपर्यंत आगीनं भीषण रूप धारण केलं होतं. वैतागून मी खाली पळालो. यादरम्यान माझ्या मुलीचा हात माझ्या हातातून निसटला. जेव्हा मी माझी पत्नी आणि मुलाबरोबर बाहेर आलो, तेव्हा मला माझ्या मुलीची आठवण झाली.”
 
“मी हतबल होतो. स्थानिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी जीवाची पर्वा न करता मुलीला शोधण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले. माझ्या मुलीला आगीतून वाचवल्यानंतर माझ्या शेजाऱ्यानं तिला इमारतीच्या छतावर नेलं आहे, असं मला नंतर कळालं. आग विझवल्यानंतर मला समजलं की, माझी मुलगी घाबरली होती आणि माझा हात सोडून घराकडे जाऊ लागली, तेव्हाच शेजाऱ्यानं तिला ओढलं. कारण माझ्या घरातील सर्व सामान जळत होतं,” पंकज अग्रवाल सांगतात.
मोहम्मद आसिफ हे अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत.
 
ते सांगतात, "एका बाजूला अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर पाणी टाकत होते, तर दुसऱ्या बाजूला आमची टीम बी-ब्लॉकमध्ये गेली तेव्हा आम्हाला 60 जण तिसऱ्या मजल्यावर असल्याचं आढळून आलं.
 
“आग संपूर्ण इमारतीत नसून दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर लागली आहे, असं आम्ही त्यांना समजावून सांगितलं. त्यामुळे आम्ही सर्वांना गच्चीवर जाण्याचं आवाहनं केलं. ते सर्वांनी मान्य केलं आणि मग अशाप्रकारे सर्वांची सुखरूप सुटका झाली.”
 
चौदा मृत्यूंबाबत बोलताना आसिफ सांगतात की, “हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याने ते एकत्रच खाली पळाले. गोंधळात धुरामुळे गुदमरल्यासारखे वाटल्याने प्रत्येकजण बेशुद्ध झाला असावा. या मजल्यावर आग जास्त असल्याने सर्वांचेच मृतदेह जळून खाक झाले. यादरम्यान त्या सर्वांचा मृत्यू झाला.”
 
परत जाण्याची विनंती
"माझे वडील हृदय, किडनी, थायरॉईडचे रुग्ण आहेत. त्यांना ना रात्री औषधं घेता आली, ना आज सकाळी. औषधं आमच्या फ्लॅटमध्ये ठेवले आहेत आणि आम्ही बाहेर आहोत."
 
हे सांगताना आशीर्वाद टॉवर येथील रहिवासी प्रेम अग्रवाल यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
 
प्रेम अग्रवाल यांच्याप्रमाणेच आशीर्वाद टॉवरमध्ये राहणाऱ्या बहुतांश कुटुंबातील सदस्य इमारतीच्या आजूबाजूला उपस्थित आहेत.
 
आम्हाला फ्लॅटमध्ये जाऊ द्या, अशी विनंती ते प्रशासनाकडे करत आहेत.
प्रेम अग्रवाल सांगतात की, "रात्री जेव्हा आग लागली तेव्हा आमच्याकडे एकच पर्याय होता तो म्हणजे कसा तरी जीव वाचवून बाहेर पडण्याचा. सर्व कुटुंबांची सुटका करून प्रशासनानं गेट बंद केलं."
 
ते पुढे सांगतात, "सर्वजण बाहेर आले. पण गडबडीमुळे आम्हाला पैसे किंवा आवश्यक वस्तू सोबत घेता आल्या नाहीत. इथल्या सर्व कुटुंबांची परिस्थिती माझ्यासारखीच आहे. जीव वाचवल्यानंतर आम्ही सर्वजण आमचे सामान मिळवण्यासाठी विनवणी करत आहोत, मात्र प्रशासनाकडून कोणतेही सहकार्य केले जात नाहीये. जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी आम्हाला आत जाऊ दिले जात नाहीये.”
 
धनबादचे जिल्हाधिकारी संदीप सिंह सांगतात, “इमारतीत हा अपघात झाला असल्यामुळे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी, वायरिंगची सुरक्षितता इत्यादी सुरक्षाविषयक बाबी पटल्यानंतरच कुटुंबाला इमारतीचा वापर करता येईल. यासाठी महापालिकेचं पथक घटनास्थळाची तपासणी करत आहे.”
 
नकाशा
'झारखंड मिनरल एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी' शहरी भागाचे नकाशे पास करण्याचं काम करते, असं संदीप सिंह सांगतात.
 
2012 मध्ये त्यांनी या इमारतीचा नकाशा पास केला. त्याला 2015 मध्ये पुन्हा मंजुरी देण्यात आली.
“आधीच्या मंजूर नकाशात काही अनियमितता आढळून आली आहे का, महापालिकेच्या पथकाला हे तपासण्यास सांगितलं आहे. तसंच इमारतीच्या बांधकामादरम्यान किंवा नंतर काही नियमांचं उल्लंघन झालं आहे का हेही पाहण्यास सांगितलं आहे,” संदीप सिंह सांगतात.
 
या अपघातातील एकूण मृतांची संख्या 14 असल्याचं संदीप कुमार यांनी सांगितलं आहे.
 
Published By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या ताफ्याला भीषण अपघात, सहा वाहनांची समोरासमोर धडक