Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इकबाल सिंह चहल यांच्यावर आधी कौतुकाची थाप, आता ईडीने दिली हाक

iqbal chahal
, शनिवार, 14 जानेवारी 2023 (17:08 IST)
प्राजक्ता पोळ
Twitter
 मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना ईडीची नोटीस आली आहे. कथित कोव्हिड सेंटरमध्ये घोटाळा केल्याच्या आरोपावरून चहल यांना ईडीने चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावला आहे.
 
कोरोना काळात वैद्यकीय उपकरणे खरेदीमध्ये घोटाळा त्याचबरोबर जम्बो कोव्हिड सेंटरचे कंत्राट बेनामी कंपनीला दिल्याचे आरोप चहल यांच्यावर आहेत. हा संपूर्ण घोटाळा 100 कोटींचा असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात चहल यांना 16 जानेवारीला चौकशीसाठी ईडीने हजर राहण्यास सांगितले आहे.
 
यानिमित्ताने कोण आहेत इकबाल सिंग चहल हे जाणून घेऊया. 
 
कोण आहेत इकबाल सिंग चहल? 
इकबाल सिंग चहल हे सध्या मुंबई महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. 1989 च्या बॅचचे ते आयएएस अधिकारी आहेत. मुंबई महापालिका आयुक्त पदी नियुक्ती होण्याआधी ते जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव होते.
 
चहल यांनी धारावी पुर्नविकास विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाचे सचिव, केंद्रीय गृहमंत्रालयाचे सहसचिव, उत्पादन शुल्क आयुक्त, औरंगाबाद आणि ठाणे जिल्हाधिकारी अशी अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. 
 
20 जानेवारी 1966 चा इकबाल सिंग चहल यांचा जन्म आहे. राजस्थानमधील जोधपूर येथे चहल यांचे शिक्षण झाले आहे. बारावीमध्ये त्यांनी राष्ट्रीय उत्तीर्ण यादीत स्थान मिळवले होते.
 
त्यानंतर त्यांनी 'इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशनमधून इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादित केली. 1989 साली त्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून सनदी सेवेत प्रवेश केला. 
 
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रविण परदेशी हे मुंबई महापालिका आयुक्त पदी होते. पण कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात आणण्यात अपयशी ठरत असल्याचं कारण देत ठाकरे सरकारने 'मे' 2020 मध्ये परदेशी यांची तडकाफडकी बदली केली आणि त्यांच्या जागी इकबाल सिंग चहल यांची मुंबई महापालिका आयुक्त पदी नियुक्ती केली गेली.
 
इकबाल सिंग चहल यांची उध्दव ठाकरेंशी जवळीक वाढत गेली. ठाकरेंचे निकटवर्तीय अशी ओळख बनलेल्या इकबाल सिंग चहल यांची शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबई महापालिका आयुक्त पदावरून दुसरीकडे बदली करणार असल्याच्या चर्चा होत्या. पण सहा महिन्यात तरी असे झाले नाही. 
 
कोरोना काळात कौतुक? 
इकबाल सिंग चहल यांचं कोरोनाची मुंबईतली परिस्थिती हाताळण्यासाठी कौतुक करण्यात आले. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 
 
इंडो अमेरिकन कॉमर्समार्फत 'आयएससी कोव्हीड क्रुसेडर्स 2020 
क्विम्प्रो पुरस्कार 2021
सिटीझन ऑफ मुंबई - आयकॉनिक अचिव्हर अॅवॉर्ड 2021
मुंबई रत्न पुरस्कार 
या महत्त्वाच्या पुरस्कारांसह 10 हून पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. 
 
'इकबाल सिंग चहल द कोव्हीड वॉरियर' हे पुस्तक 5 एप्रिल 2022 मध्ये चहल यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित केले. या पुस्तकात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चहल यांच्या कामगिरीबद्दल प्रस्तावना लिहीली आहे.
 
ते लिहीतात, "इकबाल सिंग चहल आणि त्यांच्या मुंबई महापालिकेच्या टीमने कोरोनाच्या कठीण काळात उत्कृष्ट कामगिरी केली. प्रत्येक दिवशी आमचं बैठकांमधून, फोनवरून बोलणं व्हायचं. त्यावेळी वॉररूमची व्यवस्था, अ‍ॅम्ब्युलन्सचं मॅनेजमेंट, औषधांचा पुरवठा, बेडची उपलब्धता या सगळ्याच्या उपलब्धतेवरून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा विश्वास मला चहल आणि त्यांच्या सहकार्‍यांकडून मिळायचा. चहल हे एक सक्षम आणि हुशार अधिकारी आहे. जे प्रबळ इच्छाशक्तीने कठीण परिस्थितीतून मार्ग काढतात आणि त्यांच्यावर सोपवलेल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतात."
 
शिंदे-फडणवीस सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप? 
अंधेरी पूर्वच्या निवडणूकीवेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके या मुंबई महापालिका कर्मचारी होत्या. निवडणूकीआधी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. पण राजीनामा चहल यांनी स्वीकारला नाही. त्यावेळी शिवसेनेकडून इकबाल सिंग चहल हे नियमांची पायमल्ली करत असल्याचा आरोप करण्यात आला.
 
"शिंदे फडणवीस सरकार हे नियम पायदळी तुडवण्यासाठी चहल यांच्यावर दबाव आणत आहेत. चहल हे सरकारला घाबरून त्यांच्या दबावाला बळी पडून काम करत असल्याचाही" आरोप माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी चहल यांच्यावर केला होता. 
 
घोटाळ्याचे कोणते आरोप चहल यांच्यावर आहेत? 
जम्बो कोव्हीड सेंटर सुरू करताना लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट यांना कोणताही अनुभव नसताना वैद्यकीय उपकरणे पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले. 
 
या कंपनीत संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर हे भागीदार आहेत. त्याचबरोबर 2020 साली सुरू झालेल्या या कंपनीने बनावट कागदपत्रे मुंबई महापालिकेकडे सादर केले आहेत. 
 
या कंत्राटदरम्यान वैद्यकीय सेवेसंदर्भात असलेल्या अटी आणि शर्तींचा भंग करण्यात आला आहे. 
 
या संपूर्ण कंत्राटामध्ये 100 कोटींचा घोटाळा झाला आहे असे आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केले आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी, त्यांच्या कार्यालयात दोनदा फोन आला, पोलिसांनी सुरक्षा वाढवली