Gujarat News : गुजरातमध्ये मंगळवारी पतंग उडवताना पतंगाच्या दोरीने गळा कापून चार जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका चार वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या घटना राजकोट, पंचमहल, मेहसाणा आणि सुरेंद्रनगर जिल्ह्यात घडल्या. याशिवाय, राज्यभरात अनेक लोक जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पंचमहल जिल्ह्यातील हालोल शहरातील रहिवासी असलेला चार वर्षांचा कुणाल परमार त्याच्या वडिलांसोबत मोटारसायकलवरून बाजारातून पतंग आणि फुगे खरेदी करण्यासाठी जात असताना अचानक पतंगाच्या दोरीचा तुकडा त्याच्या मानेमध्ये अडकला आणि त्याची मान कापली गेली. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर तालुक्यात आणखी एक दुःखद घटना उघडकीस आली, जिथे 35 वर्षीय शेतकरी मनसाजी ठाकोर यांची मान पतंगाच्या दोरीने कापली गेली. हा अपघात झाला तेव्हा तो मोटारसायकलवरून त्याच्या गावी जात होता. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. राजकोट जिल्ह्याच्या बाहेरील भागात, ईश्वर ठाकोर नावाचा एक व्यक्ती पतंगाच्या दोरीने गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. याशिवाय, सुरेंद्रनगर जिल्ह्यातील पाटडी तालुक्यात मानेत मांजा अडकल्याने आणखी एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला.
Edited By- Dhanashri Naik