जेष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येच्या आरोपी परशुराम वाघमारेने लंकेश यांची हत्या केल्याची कबुली दिली असून धर्म रक्षणासाठीच गौरी लंकेश यांची हत्या केली असल्याचा एक धक्कादायक खुलासा त्याने त्याच्या कबुलीजबाबातून केला आहे.
कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) परशुराम वाघमारे याला अटक केली आहे. परशुराम वाघमारे याने ५ सप्टेंबर २०१७ रोजी बंगळूरूच्या आरआर नगरयेथील गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरासमोरच त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती. आपण कोणाला मारणार आहोत, हे तेव्हा वाघमारेला ठाऊक नव्हते. आपल्या धर्माच्या रक्षणासाठी एका व्यक्तिची हत्या करायची असल्याचे वाघमारेला सांगण्यात आले होते. एटीएससमोर वाघमारेने दिलेल्या कबुली जबाबात म्हटले की,‘मी कोणाला मारणार आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती. धर्मरक्षणासाठी एक खून करायचा आहे, असे २०१७मध्ये मला सांगितले गेले होते. मी तो खून करायला तयार झालो. त्या कोण होत्या हे मला माहिती नव्हते. पण त्यांनी मी मारायला नको होते असे मला आता वाटतेय’असे त्याने सांगितले.