Crime News हरियाणातील गुडगाव जिल्ह्यातील नथुपूर गावात पत्नीची साडी चोरल्याचा आरोप करत एका व्यक्तीने शेजाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी आरोपी अजय कुमारची पत्नी रीना हिने पतीला सांगितले की, त्यांचा शेजारी पिंटू कुमार (30) याने तिची साडी चोरली आहे. पिंटू गुरुग्राममध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. पोलिसांनी सांगितले की, रात्री आठच्या सुमारास पिंटू ड्युटीवरून परतला तेव्हा अजय त्याच्याशी बोलला, मात्र पिंटूने आरोप फेटाळून लावले, त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला.
पोलिसांनी सांगितले की पिंटू मूळचा बिहारचा आणि अजय (42) उत्तर प्रदेशचा राहणारा नाथुपूर गावात एकाच घरात भाड्याने वेगळ्या खोलीत राहत होता. पिंटूचा रूममेट आणि घटनेचा प्रत्यक्षदर्शी अशोक कुमार याने पोलिसांना सांगितले की, भांडणाच्या वेळी अजयने त्याच्या खोलीतून बंदूक काढून पिंटूच्या पोटात गोळी झाडली. अशोकने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, “आम्ही त्याची बंदूक हिसकावून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने पुन्हा बंदूक हिसकावून पिंटूला गोळी झाडली. आम्ही पिंटूला जवळच्या रुग्णालयात नेले, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी सांगितले की अजयच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, “आरोपी सुरक्षा रक्षकाने त्याच्या परवाना असलेल्या बंदुकीने दुसऱ्या सुरक्षा रक्षकावर गोळी झाडली. त्याची बंदूक जप्त करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल.