Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'भारतरत्न' देऊन नरेंद्र मोदींनी निवडणुकीचं समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे का?

'भारतरत्न' देऊन नरेंद्र मोदींनी निवडणुकीचं समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे का?
, रविवार, 11 फेब्रुवारी 2024 (12:58 IST)
कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर मोदी सरकारने माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि भारतातील हरित क्रांतीचे जनक कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांना 'भारतरत्न' देण्याची घोषणा केली.
 
'भारतरत्न' हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
 
चौधरी चरणसिंह हे देशाचे सहावे पंतप्रधान होते. मात्र त्यांचा कार्यकाळ खूपच कमी होता.
 
28 जुलै 1979 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या 170 दिवसांनी त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. कारण त्यांना सभागृहात त्यांच्या सरकारचं बहुमत सिद्ध करता आलं नव्हतं.
 
चौधरी चरणसिंह हे मोठे शेतकरी नेते होते. 1977 मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार स्थापन करण्यात त्यांच्या पक्षाचं मोठं योगदान होतं.
 
पी. व्ही. नरसिंह राव हे देशाचे 10 वे पंतप्रधान होते. 21 जून 1991 ते 16 मे 1996 पर्यंत पंतप्रधान राहिलेल्या नरसिंह राव यांनी जगासाठी भारतीय अर्थव्यवस्था खुली केली.
 
त्यांनी भारतात मोठ्या आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. ते आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि देशाचे गृहमंत्री देखील होते.
 
डॉ. एम. एस स्वामीनाथन यांना भारतातील 'हरित क्रांती'चे जनक मानलं जातं. त्यांनी 1960 ते 1970 च्या दशकात भारतीय शेतीमध्ये क्रांतिकारी बदल घडवले. अन्न सुरक्षेचं उद्दिष्ट साध्य करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत या तिघांच्याही योगदानाचं कौतुक केलं आहे.
 
कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, पी. व्ही. नरसिंह राव आणि चौधरी चरणसिंह यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन राजकीय गणित जुळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जातंय.
 
पी. व्ही. नरसिंह राव यांना 'भारतरत्न' देण्यामागचे कारण
एवढ्या मोठ्या संख्येने 'भारतरत्न' देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीचं समीकरण साधण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.
 
वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक नीलांजन मुखोपाध्याय म्हणतात, "पंतप्रधानांची योजना पूर्णपणे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आखलेली आहे. निवडणुका जवळ आल्यावर यांना कर्पूरी ठाकूर यांची आठवण झाली. ज्या आडवाणींना राम मंदिराच्या सोहळ्यासाठी येऊ दिलं नाही त्यांना 'भारतरत्न' दिला गेला. खरं तर असं करून मोदींना निवडणुकीपूर्वी संघ परिवाराशी असलेले मतभेद संपवायचे होते."
 
नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच 'घराणेशाही'वर वक्तव्य करत काँग्रेसला घराणेशाहीचा पक्ष म्हणण्याचा प्रयत्न केलाय.
 
विश्लेषकांच्या मते, नरसिंह राव यांना भारतरत्न देऊन मोदींना दाखवून द्यायचं आहे की, काँग्रेस मध्ये केवळ घराणेशाही चालते. नरसिंहराव हे सक्षम पंतप्रधान होते, मात्र सोनिया गांधींनी त्यांचा अपमान केला हे भाजपला दाखवून द्यायचं आहे.
निलांजन मुखोपाध्याय म्हणतात, "ही भाजपची जुनी खेळी आहे. भारतीय जनता पक्षाच्या पंतप्रधानांनंतर सर्वात सक्षम पंतप्रधान म्हणून त्यांनी नरसिंह राव यांच्याकडे पाहिलं आहे. त्यामुळेच भाजप आता त्यांचा सन्मान करत आहे. यातून त्यांना दाखवायचं आहे की, केवळ घराणेशाहीमुळे काँग्रेसने त्यांचा अपमान केलाय. नाहीतर ते सक्षम पंतप्रधान होते."
 
नीलंजन म्हणतात की, यावेळी आपण 400 पेक्षा जास्त जागा निवडून आणू असं पंतप्रधान बोलत आहेत. मात्र राम मंदिर, जातीयवादाचा उदय, कल्याणकारी योजनांचा प्रसार आणि प्रचंड प्रसिद्धी करूनही त्यांना विविध समुदायांना खूश करण्यासाठी 'भारतरत्न'चा आधार घ्यावा लागतोय.
 
भाजप आता लहान पक्षांसोबत युती करण्याच्या प्रयत्नात आहे. यावरून असं दिसतंय की, त्यांना निवडणुकीत फटका बसण्याची भीती आहे. कदाचित यासाठीच ही गोळाबेरीज केली जात असावी.
 
निवडणुकीचं समीकरण सोडवण्याचा प्रयत्न
मोदी सरकार भारतरत्नचा वापर 'निवडणुकीचं साधन' म्हणून करत असल्याचं काही विश्लेषकांचं मत आहे.
 
भारतरत्न देण्याची तरतूद संविधानाच्या कलम 18 (1) मध्ये आहे. हा सन्मान 1954 पासून दिला होतोय. आणि नियमानुसार एका वर्षात फक्त तीन पुरस्कार दिले जातात.
 
मात्र यावेळी मोदी सरकारने देशातील पाच लोकांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. याआधी 1999 मध्ये एकाच वेळी चार जणांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
 
यावेळी निवडणुकीपूर्वी पाच लोकांना भारतरत्न देण्याच्या घोषणेवर वरिष्ठ पत्रकार हेमंत अत्री म्हणतात, "हा 'भारतरत्न' नसून 'निवडणूक रत्न' आहे. निवडणुकीचं समीकरण सोडवण्याचा हा प्रयत्न आहे. कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर नितीश कुमार यांचं सरकार कोसळलं. त्याचप्रमाणे चौधरी चरणसिंह यांच्यासाठी घोषणा केल्यानंतर आरएलडीचे जयंत चौधरी यांनी भाजपसोबत युती करण्याचे संकेत दिले."
 
हेमंत अत्री म्हणतात की, "चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देण्याची घोषणा होताच त्यांचे नातू आणि आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी म्हणाले की, आता आणखीन काय पाहिजे. ते आता एनडीएमध्ये जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांची जागावाटपावरही चर्चा झाली आहे. आरएलडीला लोकसभा आणि राज्यसभेच्या किती जागा मिळतील आणि त्यांच्या पक्षाचे उत्तरप्रदेशात किती मंत्री असतील हेही ठरलंय."
 
पण नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या आधी ज्येष्ठ शेतकरी नेते चौधरी चरणसिंह यांना 'भारतरत्न' देण्याची घोषणा का केली?
 
दोन महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशच्या पश्चिम पट्ट्यातील जाट मतं गमावण्याची भीती भाजपला आहे का?
 
या प्रश्नाच्या उत्तरात हेमंत अत्री म्हणतात, "शेतकरी आपल्या मागण्या घेऊन 13 महिने दिल्लीबाहेर बसले. मात्र त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. पण आता चौधरी चरणसिंह आणि एम. एस. स्वामिनाथन यांना 'भारतरत्न' देण्याची घोषणा करून ते प्रतीकाचं राजकारण करत आहेत. ते म्हणतात की, जे शेतकऱ्यांचे सर्वात मोठे हितचिंतक होते त्यांना आमच्या सरकारने देशातील सर्वोच्च नागरी सन्मान देऊ केलाय. शेतकऱ्यांना आणखी काय हवंय?"
 
कृषी धोरण आणि संबंधित बाबींचे तज्ज्ञ देविंदर शर्मा यांचंही हेच मत आहे की, आरएलडीने एनडीएमध्ये यावं यासाठी चौधरी चरणसिंह यांना 'भारतरत्न' देण्याची रणनीती आखली आहे.
 
ते म्हणतात की, एम. एस. स्वामीनाथन 'हरित क्रांती'साठी आणि वर्गीस कुरियन हे 'श्वेत क्रांती'साठी ओळखले जातात. परंतु स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत न देणं पण त्याच स्वामीनाथन यांना 'भारतरत्न' जाहीर करणं हे एक प्रकारे प्रतीकवादाचं राजकारण म्हणावं लागेल.
 
उत्तरप्रदेश मध्ये आरएलडीसोबत युती करण्याचा प्रयत्न का?
काही विश्लेषकांच्या मते, 2013 साली मुझफ्फरनगर मध्ये झालेल्या जाट विरुद्ध मुस्लिम दंगलीनंतर जाटांनी मोठ्या संख्येने राष्ट्रीय लोकदल सोडला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. आपली जातीय ओळख विसरून ते हिंदू बनले.
 
पश्चिम उत्तरप्रदेशात मोठ्या संख्येने जाट आणि मुस्लिम आहेत. इथे लोकसभेच्या एकूण 27 जागा असून 2019 च्या निवडणुकीत भाजपने यातील 19 जागा जिंकल्या होत्या. एवढी मजबूत स्थिती असतानाही भाजपला इथे आरएलडीसोबत युती का करायची आहे?
 
वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक शरद गुप्ता म्हणतात, "मोदी सरकारने यावेळच्या अर्थसंकल्पात कोणतीही आकर्षक घोषणा केलेली नाही. मध्यमवर्गीयांना ना करात सवलत दिलीय ना किसान सन्मान निधी वाढवला आहे. म्हणजेच मोदी सरकारला निवडणुकीत विजय मिळणार यावर पूर्ण विश्वास आहे. तरीही मोदी आणि शाह या जोडगळीला नुसताच विजय नकोय तर दणदणीत विजय हवाय. म्हणजे जिथे त्यांच्या जागा प्रत्येकी चार हजारांच्या फरकाने निवडून येत असतील तर त्याच जागा त्यांना 50 हजारांच्या फरकाने निवडून आणायच्या आहेत"
 
शरद गुप्ता सांगतात की, आपल्या दणदणीत विजयासाठी भाजप आरएलडी, जितन राम मांझी यांच्या हिंदुस्थान अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) यांसारख्या छोट्या पक्षांसोबत युती करत आहे. या पक्षांना स्वबळावर निवडणुका जिंकता येत नसल्या तरी त्यांच्या मतांमुळे भाजपची ताकद अनेक पटींनी वाढते. भाजपला दोन आणि दोन मिळवून बावीस करायचे आहेत.
 
मग मतदारांच्या कोणत्या वर्गाला आकर्षित करण्यासाठी भाजपने माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे?
 
शरद गुप्ता म्हणतात, "याद्वारे पंतप्रधानांना काँग्रेसच्या कथित घराणेशाहीकडे लक्ष वेधायचं आहे. ज्या पंतप्रधानांचं पार्थिव काँग्रेस कार्यालयात आणू दिलं नाही त्याच पंतप्रधानांचा सन्मान भाजपने केलाय असं त्यांना दाखवायचं आहे. भाजपने मनमोहन सिंग यांनाही भारतरत्न देण्याची घोषणा केली तर यात नवल वाटून घेण्यासारखं काहीच नाही."
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नोकरीच्या नावाखाली 20 महिलांवर सामूहिक बलात्कार