मध्य प्रदेशच्या बैतुल मध्ये गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण रस्ता अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. बैतूल जिल्ह्यातील झाल्लार पोलीस ठाण्याजवळ हा अपघात झाला. रात्री 2.15 च्या सुमारास एका रिकाम्या बसला तवेरा कारची धडक बसून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला, तर कार चालक गंभीर जखमी झाला, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये पाच पुरुष, चार महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. सर्व मृतांचे मृतदेह झाल्लार प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत. सर्व मृतक झाल्लार गावातील रहिवासी होते. घटनास्थळापासून या गावाचे अंतर फक्त एक किलोमीटर आहे.
बेतुलच्या झाल्लार येथून 20 दिवसांपूर्वी सर्व लोक अमरावतीच्या एका गावात कामावर गेले होते, गुरुवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास सर्व लोक अमरावतीहून झाल्लारकडे निघाले होते. रात्री दोन वाजता ड्रायव्हरला झापड आली आणि कार अनियंत्रित होऊन थेट बसवर आदळली, अपघात खूपच भीषण होता, दोन मुलांसह सर्व 11 जण जागीच मरण पावले.
अपघातात कारचा चक्काचूर झाला. अपघातानंतर कार कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. अपघाताची माहिती मिळताच एसपीसह अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.