Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिमाचल प्रदेश : किन्नौरमध्ये दरड कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेश : किन्नौरमध्ये दरड कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू
, गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (12:03 IST)
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील भावनगर तालुक्यात दरड कोसळल्याची घटना बुधवारी (11 ऑगस्ट) घडली. या दरडीखाली हिमाचल परिवहन सेवेची एक बस, काही ट्रक आणि काही छोटी वाहनं दबले गेल्याची माहिती मिळत आहे.
 
या दुर्घटनेत 13 जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक दबले असल्याची शक्यता वर्तवली जातीये.
 
ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 5 वर निगोसारी आणि चौरादरम्यान घडली. याठिकाणी एका डोंगराचा तुकडा अचानक कोसळून खाली आला.
 
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, "दरडीखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. पीडितांना शक्य ती मदत प्रशासनाकडून केली जाईल." हिमाचल परिवहन मंडळाची बस मुरंगहून हरिद्वारला जात होती. शिवाय इतर वाहनांमध्ये काही लोक बसलेले होते.
 
दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा प्रशासनाचं बचाव पथक दाखल झालं स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (11 ऑगस्ट) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. या अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळाच्या दिशेने रवाना झालं. दरड कोसळल्यामुळे गाडल्या गेलेल्या लोकांचं शोधकार्य सुरू करण्यात आलं आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याकडून या घटनेची माहिती घेतली.
 
त्याचा बचाव कार्यात शक्य तितकं सहकार्य करण्यात येईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींना ठाकूर यांना दिल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करून दिली.
 
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांत दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या आठवड्यात हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमध्ये भूस्खलन झाल्यामुळे नाहन-श्रीरेणूकाजी-हरिपूरधार रस्ता बंद झाला होता. याठिकाणी जोरदार पावसामुळे भूस्खलन होऊन डोंगराला भलीमोठा तडा गेला. यामुळे रस्ताही वाहून गेला. त्यामुळे शेकडोंच्या संख्येने लोक रस्त्यातच अडकले.
 
30 जुलै रोजी सिरमौरच्या कामराऊ तालुक्यातील भूस्खलनाचा एक व्हीडिओही व्हायरल झाला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Elephant Day जागतिक हत्ती दिनाबद्दल काही 'रोचक तथ्य' जाणून घ्या