अटल बिहारी वाजपेयी यांच्या रुपाने भारताने आपले अनमोल रत्न गमावले आहे. आज आमच्याकडे शब्द नाहीत. अटलजींच्या निधनाने एका पर्वाचा अस्त झाला आहे. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालीय ती कधीच भरुन येणार नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या. अटलजींच्या निधनाने देशाचे न भरुन येणार नुकसान झाले आहे. ते नेते, वक्ते, ओजस्वी कवी, पत्रकार होतेच पण त्याचबरोबरीने अटलजी भारतमातेचे खरे सुपूत्र होते. त्यांच्याकडून मला वडिलांसारखे प्रेम मिळाले. आज डोक्यावरुन वडिलांचे छत्र हरपल्याची माझी भावना आहे. असे पंतप्रधान मोदी आपल्या शोकसंदेशात म्हणाले.
अटलजींचे विराट व्यक्तिमत्व आणि त्यांच्या निधनाचे दु:ख शब्दांमध्ये मांडता येणार नाही. अटलजींनी मला संघटना आणि शासन दोघांचे महत्व समजावले. अटलजींच्या जाण्यामुळे माझ्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही असे मोदी म्हणाले. अटलजींनी भाजपाचा विचार सर्वदूर लोकांपर्यंत पोहोचवला. त्यांचा निश्चच आणि मेहनतीमुळेच भाजपा आज इथवर येऊन पोहोचला आहे असे मोदींनी सांगितले. अटलजी आज आपल्यात नसले तरी त्यांची वाणी, विचार नेहमीच भारतीयांना प्रेरणा देत राहील असे मोदी म्हणाले.