Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीय नौदलाच्या २२ व्या क्षेपणास्त्र वेसल स्क्वॉड्रनला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'प्रेसिडेंटस स्टॅंडर्ड' प्रदान

भारतीय नौदलाच्या २२ व्या क्षेपणास्त्र वेसल स्क्वॉड्रनला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'प्रेसिडेंटस स्टॅंडर्ड' प्रदान
, गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (08:41 IST)
सागरी व्यापारामध्ये भारतीय सागरी क्षेत्राचा मोठा वाटा आहे, त्यामुळे या क्षेत्रात शांतता राखणे केवळ आपल्यासाठीच नव्हे तर संपूर्ण जागतिक समुदायासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आज, जगातील सर्वात मोठ्या नौदलांपैकी एक असलेल्या भारतीय नौदलाकडे आपले सागरी शेजारी हिंद महासागर प्रदेशातील एक पसंतीचे सुरक्षाविषयक भागीदार म्हणून अपेक्षेने पाहत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी  केले.
 
मुंबईच्या नेव्हल डॉकयार्ड येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते  ’22 वी वेसल स्क्वॉड्रन’ या क्षेपणास्त्र युद्धनौकेवरील तुकडीला प्रेसिडेंट’स स्टॅंडर्ड हा सन्मान समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. लेफ्टनंट युध्दी सुहाग यांनी ’22 वी वेसल स्क्वॉड्रन, या क्षेपणास्त्र युद्धनौकेवरील तुकडीला दिलेला प्रेसिडेंट’स स्टॅंडर्ड पुरस्कार राष्ट्रपतींकडून स्वीकारला. या कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राष्ट्रपतींच्या पत्नी श्रीमती सविता कोविंद, राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे, नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार यांचेसह नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या समारंभाच्या गौरवार्थ भारतीय टपाल विभागातर्फे जारी करण्यात आलेल्या विशेष टपाल कव्हरचे देखील यावेळी प्रकाशन करण्यात आले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, वीर आणि प्रबल वर्गाच्या जहाजांचा समावेश करुन ‘किलर स्क्वॉड्रन’  सतत विकसित होत आहे. या प्रबल वर्गाची जहाजे भारतात बांधली गेली आहेत, ही आनंदाची बाब असून ती स्वदेशीकरणाप्रती नौदलाची वचनबद्धता आणि ‘आत्मनिर्भर भारता’प्रती भारतीय नौदलाची दृष्टी दर्शविते. 17 व्या शतकात भारतात युद्धासाठी सज्ज अशा नौदलाची उभारणी करणारे, नौदलाचे संस्थापक, द्रष्टे राजे म्हणून ज्यांचा गौरव होतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांना ही मानवंदना असल्याचेही राष्ट्रपती म्हणाले.
प्रारंभी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ’22 वी किलर स्क्वॉड्रन्स’ या तुकडीतील सर्व ज्येष्ठ तसेच, सेवेत असलेल्या जवानांनी देशासाठी केलेल्या महान सेवेबद्दल त्यांचे अभिनंदन करुन सर्वोच्च बलिदान देणारे शूर खलाशी आणि अधिकाऱ्यांनाही राष्ट्रपती श्री.कोविंद यांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.
देश ‘स्वर्णिम विजय वर्ष’ साजरे करीत असतानाच ’22 वी किलर स्क्वॉड्रन्स’ या क्षेपणास्त्र युद्धनौकेवरील तुकडीला प्रेसिडेंट’स स्टॅंडर्ड हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे, ही अतिशय योग्य वेळ असून या तुकडीने केलेले कार्य हे भूतकाळातील आणि वर्तमानकाळातील अधिकारी-खलाशी यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवेची साक्ष आहे. 22 व्या क्षेपणास्त्र वेसल स्क्वाड्रनने गेल्या पाच दशकांमध्ये अविरत, अखंडित असा प्रवास केला आहे. 1970 मध्ये सोव्हियत रशियाकडून वेसल स्क्वॉड्रनने ओएसए एक वर्गाची आठ जहाजे समाविष्ट करुन या स्क्वॉड्रनचा गौरवशाली इतिहास सुरु झाला. या स्क्वॉड्रनचा वेग आणि फायर पॉवरसाठी प्रसिद्ध असलेल्या या जहाजांनी 1971 च्या युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. याच युद्धात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात केलेल्या यशस्वी नौदल कारवायांच्या स्मरणार्थ चार दिवसांपूर्वी आपण नौदल दिन साजरा केल्याचे राष्ट्रपती म्हणाले.
‘ऑपरेशन्स ट्रायडंट’ आणि ‘पायथन’द्वारे आपल्या जहाजांनी पाकिस्तानच्या नौदलाच्या जहाजांना पश्चिमेकडील समुद्रात बुडवले आणि शत्रूच्या युद्धाच्या प्रयत्नांना मारक झटका दिल्याचे पाहिले आहे. पन्नास वर्षांपूर्वी, आजच्या दिवशी म्हणजे 8 डिसेंबर रोजी, या किलर स्क्वाड्रन जहाजांनी कराची बंदर जाळत, शत्रूचे मनोबल खच्ची केले. कराचीवर नाकेबंदी केली आणि संपूर्ण समुद्रावर नियंत्रण मिळवले. या युद्धनौका आपल्या नौदलासाठी युद्धातील सर्वात शक्तिशाली लढावू ताकद ठरल्या आहेत. राष्ट्रपती स्टॅण्डर्ड सन्मान प्रदान करणे म्हणजे या तुकडीच्या विद्यमान आणि माजी अधिकारी तसेच नाविकांनी राष्ट्राप्रती केलेल्या अतुलनीय सेवा आणि समर्पणाला दिलेली पावती असल्याचेही राष्ट्रपती कोविंद यावेळी म्हणाले.
 
आपले राष्ट्र हे सागरी राष्ट्र असून देशाचे  परराष्ट्र धोरण पुढे नेण्यात आणि आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांचे आणि व्यावसायिक हितांचे रक्षण करण्यात आपल्या नौदलाची मोठी भूमिका आहे. भारतीय नौदल आपल्या व्यापक सागरी हितांचे यशस्वीपणे रक्षण करत असल्याबद्दल राष्ट्रपती श्री. कोविंद यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
 
देशात आणि देशाबाहेर मानवी संकटे किंवा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी लोकांना मदत करण्यातही भारतीय नौदल आघाडीवर आहे, कोविड-19 च्या संकटात भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यात तसेच तौक्ते चक्रीवादळादरम्यान बचाव कार्यातही भारतीय नौदलाने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली, याबद्दल राष्ट्रपती श्री. कोविंद यांनी नौसेनेच्या कार्याचे कौतुक करुन ’22 वी किलर स्क्वॉड्रन्स’ या क्षेपणास्त्र युद्धनौकेवरील तुकडीला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 
प्रारंभी सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर तथा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना नौदलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. नौदलाच्या ‘चेतक’ सह विविध हेलिकॉप्टर्सनी यावेळी कसरती करुन नौदलाच्या शक्तीचे प्रदर्शन घडवले त्यांनी समुद्रातील शोध मोहीम, बचाव कार्य आदींची प्रात्याक्षिके केली. यावेळी ’22 वी वेसल स्क्वॉड्रन्स’ या क्षेपणास्त्र युद्धनौकेवरील तुकडीसाठी  विविध धर्मांच्या धर्मगुरूंकडून विशेष प्रार्थना करण्यात आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सन फार्मा कंपनीला भीषण आग !