Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

RSS आणि भाजप यांच्यातील शक्तीचं संतुलन बदलत आहे का?

Narendra Modi
, गुरूवार, 25 जानेवारी 2024 (13:03 IST)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात अगदी जवळचा संबंध असल्याचं सर्वांनाच माहिती आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत हे सार्वजनिक कार्यक्रमासाठी एकाच व्यासपीठावर आल्याचे फारसे प्रसंग समोर आलेले नाहीत.
 
 2020 मध्ये अयोध्येच्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात दोघं एकत्र दिसले होते.

सोमवारी (22 जानेवारी) राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान पुन्हा एकदा मोदी आणि भागवत एकत्र दिसले होते. राम मंदिराच्या गर्भगृहात भागवत आणि मोदी आधी पूजा करताना आणि नंतर भाषणाच्या वेळीही एकत्र होते.
 
नात्यात बदल?
मोहन भागवत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थित नक्कीच होते, पण ते सोहळ्यातील प्रमुख नव्हते. भागवत यांनी भाषणामध्ये पंतप्रधानांचं तोंडभरून कौतुक केलं. "या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आधी पंतप्रधानांनी कडक उपवास केला. ज्या पद्धतीनं उपवास करण्यास सांगण्यात आलं होतं, त्यापेक्षाही कडक उपवास त्यांनी केला. माझी आणि त्यांची जुनी ओळख आहे आणि त्यामुळं मला माहिती आहे की, ते तपस्वी आहेत." आरएसएस भाजपची मातृ संघटना असल्यानं त्यांचा भाजपवर प्रभाव असणं स्वाभाविकच आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी संघाचे सक्रिय प्रचारकही होते. पण गेल्या अनेक वर्षांपासून एक विषय कायम चर्चेत राहिला आहे. तो म्हणजे, भाजप नेहमीच संघाच्या नियंत्रणाखालीच काम करतं का? जर तसं नसेल तर मग भाजपवर आरएसएसचं किती नियंत्रण आहे?
राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात धर्म आणि राजकारण यामध्ये असलेली रेष अस्पष्ट झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचवेळी भागवत यांच्या उपस्थितीतीमुळं एक प्रश्नही निर्माण झाला. तो म्हणजे भाजप आणि आरएसएसच्या नात्यात बदल पाहायला मिळत आहे का?
 
'शक्तीच्या संतुलनात बदल?'
नीलांजन मुखोपाध्याय एक लेखक आणि राजकीय विश्लेषक आहेत. त्यांनी बाबरी मशीद विध्वंस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही मुख्य व्यक्तींवर पुस्तकं लिहिली आहेत. त्यांच्या मते, मोहन भागवत यांना व्यासपीठावर बोलावणं आणि त्यांनी भाषण करणं हे महत्त्वाचं आहे. ऑगस्ट 2020 मध्ये मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यातही भागवत यांना स्थान देण्यात आलं होतं, असंही त्यांनी सांगितलं. "आरएसएस आणि भाजप यांच्यात आता शक्तीच्या संतुलनात बदल झाला आहे," असं ते म्हणाले.

मुखोपाध्याय म्हणाले की, "त्यावेळी (मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना) आरएसएसच्या काही लोकांना वाटलं होतं की, मोदी मुख्यमंत्री आहेत पण सोबतच ते प्रचारकही आहेत. त्यामुळं त्यांनी संघाच्या कार्यालयात जाऊन वरिष्ठांना माहिती द्यायला हवी. पण मोदी संघ कार्यालयात गेले नाही. तरीही मुख्यमंत्री असताना मोदींनी संघाचा अजेंडाच पुढं नेला." "निवडून आलेल्या नेत्याने संघ कार्यालयात जाऊ नये, असे मोदींचे मत आहे. ते पंतप्रधान झाले तेव्हा मी एक लेख लिहिला होता. त्यात आरएसएस आधी ज्याप्रकारे मोठ्या भावाच्या रुपात दिसत होतं तेच सुरू राहील की तो जुळा भाऊ होईल, असं लिहिलं होतं. काही काळांनंतर दोन्हींमध्ये साम्य आलं आणि संघाचा वरचष्मा कमी झाला," असं मुखोपाध्याय म्हणाले.
 
'भागवत यांनी दाखवून दिलं, की बॉस तेच आहेत'
भागवत गर्भगृहात असण्याचा अर्थ काय? यातून आरएसएस आणि भाजपच्या नात्यात येणाऱ्या बदलाची झलक पाहायला मिळते का? वरिष्ठ पत्रकार रामदत्त त्रिपाठी यांच्या मते, "मला बदल तर दिसत नाही. माझ्या मते, कधी-कधी काळाची गरज पाहता स्क्रिप्ट, रोल आणि डायलॉग बदलतात. प्राण प्रतिष्ठेचा जो सोहळा होता ते मोदींचं वैभव होतं. त्यांचा करिश्मा दाखवण्यासाठी होतं. कारण आरएसएस मोदींचा वापर त्यांचं दीर्घकालीन उद्दिष्ट सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांचं जे काही उद्दिष्ट आहे ते, पूर्ण करण्यासाठी मोठी राजकीय शक्ती गरजेची आहे, हे आरएसएसला माहिती आहे."त्रिपाठी म्हणाले की, आरएसएस भाजपची मातृसंघटना आहे. कधी-कधी लोकांना वाटू लागलं होतं की, आरएसएस भाजपची सांस्कृतिक शाखा असून आरएसएस प्रमुख हे एक लहान व्यक्तिमत्त्व आहे. "पण मोहन भागवत यांनी आज तेच बॉस असल्याचं दाखवून दिलं. तर राजकीय प्रोजेक्टचे नेते मोदी आहेत. जर ते बॉस नसते तर गर्भगृहात ते असण्याची गरज काय होती, मोदींना तशी गरज का पडली?" असं ते म्हणाले.
 
'भागवत मोदींना निर्देश देऊ शकत नाही'
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्यात आणि तत्कालीन सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांच्यात फार चांगले संबंध नव्हते. अनेक मुद्द्यांवर त्या दोघांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या नेहमी येत होत्या. भाजपनं 2014 ची निवडणूक जिंकून सरकार स्थापन केलं आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले तेव्हा दीर्घकाळासाठी पक्षाचा आणि सरकारचा रिमोट नागपूर (संघाचे मुख्यालय) च्या हाती असल्याच्या चर्चा होत्या. त्यावेळी मोदी सरकारचे अनेक मंत्री आरएसएसच्या दिल्ली येथील झंडेवालान भागातील कार्यालयात नियमितपणे 'हजेरी' लावत होते आणि त्यांच्या मंत्रालयांचा लेखा-जोखा द्यायचे हे सर्वांनाच माहिती आहे.नीलांजन मुखोपाध्याय यांच्या मते, त्यांना असलेल्या माहितीनुसार मोदी कधीही मोहन भागवत यांना भेटायला गेले नाहीत. "जर ते भेटले असतील तर शक्यतो मोदींनी भागवत यांना घरी बोलावलं असेल. अनेक कार्यक्रमांत भागवत यांनी सार्वजनिकरित्या मोदींचं कौतुक केलं आहे. आधी तसं होत नव्हतं. संघ परिवारात निश्चितपणे सत्ता समीकरणं बदलली आहेत. सरसंघचालक आता पंतप्रधानांना निर्देश देऊ शकत नाहीत." मुखोपाध्याय म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी कधीही संघाच्या कोणत्याही मूल्यांचं उल्लंघन केलं नाही. त्यांच्या मते, "उलट ते नेहमीप्रमाणं तेवढेच कट्टर प्रचारक राहिले. मग संघ कशाला नाराज असेल? सरकार चालवण्याच्या पद्धतीवर काही मतभेद असू शकतात. पण पंतप्रधानांनीही संघाला सांगितलं असेल की, सरकार चालवणं हे त्यांचं काम आहे. संघाला एखाद्या धोरणावर आक्षेप असेल तर त्यांनी तसं सांगावं."
 
पुढचा मार्ग?
आता महत्त्वाचा प्रश्न समोर उभा राहतो तो म्हणजे, आगामी काळात भाजप आणि आरएसएसचे नाते कोणत्या दिशेने पुढे जाईल? राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजप सरकार केंद्रात असल्यानं संघाला मोठा फायदा होत आहे. तसंच भाजपला असं वाटतं की, आरएसएसच्या शेवटच्या कार्यकर्त्यांशिवाय त्यांना निवडणूक जिंकणं कठिण ठरेल. त्यामुळं दोघांना एकमेकांची गरज आहे. त्यामुळं दोघांमध्ये संघर्ष होणार नाही. नीलांजन मुखोपाध्याय यांच्या मते, "वाजपेयी यांच्या काळाच्या उलट, नरेंद्र मोदी यांच्याकडं संख्याबळ चांगलं आहे. त्यामुळं ते सरकारच्या अनेक विभाग किंवा समित्यांमध्ये संघाच्या लोकांचा समावेश करू शकतात. मुखोपाध्याय यांच्या मते, आगामी काळात आरएसएस आणि भाजप यांच्यात चांगला ताळमेळ असेल. "आरएसएसला फायदा होत आहे. 2004 मध्ये आरएसएसमध्ये तेवढा उत्साह नव्हता. कारण वाजपेयी आणि सुदर्शन यांच्यातलं नातं फार चांगलं नव्हतं. तसंच वाजपेयींना आरएसएस आणि त्यांच्या लोकांसाठी फार काही करता आल नाही. पण आता काहीच अडचण नाही." आरएसएस आता मागच्या सीटवर असल्याचं ते म्हणाले. "मोदी रिझल्ट देत आहेत आणि ते संघाच्या अजेंड्याबरोबरच विचारसरणी पूर्ण करत आहे, हे आरएसएसला समजलं आहे. त्यामुळं मोदींना स्वातंत्र्य द्यावं लागेल हे त्यांना कळून चुकलं आहे. मोदी जर या मार्गावरून हटू लागले तर ते थोडी हालचाल करून काय करायचं याचा अंदाज घेतील." त्याचवेळी रामदत्त त्रिपाठी म्हणाले की, प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान मोहन भागवत यांनी भाषणात म्हटलं होतं की, उत्साहाच्या भरात भान हरपून चालत नाही.
 
त्रिपाठी यांच्या मते, "त्यांचा असा अर्थ होता की, ही माझी सेना आहे आणि मीच नियंत्रक आहे. ते सर्वांना म्हणाले की, शिस्तीत राहावं लागेल. कारण अशीही भीती आहे की, आज निर्माण झालेली ऊर्जा पाहता, अयोध्येसारखं इतर ठिकाणीही घडलं तर त्या ऊर्जेवर नियंत्रण मिळवलं कठीण होईल. भागवत यांना असं म्हणायचं आहे की, ठरल्यानुसार कार्यक्रम सांगावं आणि कार्यकर्त्यांनी तेवढंच करावं. सांस्कृतिक पुनरुत्थानबद्दल जे बोलत आहेत ते स्वतःच मशीद आणि मजारींच्या नावावर आपसांत भिडायला नको." त्रिपाठी यांच्या मते, प्राण प्रतिष्ठेनंतर मोदी आणि भागवत यांनी स्वतःवर खूप मोठी जबाबदारी ओढवून घेतली आहे. कारण ते रामराज्याबाबत बोलले. ते म्हणाले, "कार्यकर्त्यांवर तर संघाचं नियंत्रण आहे. त्याबद्दल कुणालाही गैरसमज असता कामा नये. आरएसएसचा प्रत्येक शब्द तर वाजपेयीही ऐकत नव्हते, पण स्क्रिप्ट त्यांच्याकडूनच येत होती. सर्वांची भूमिका आधीच ठरलेली असायची."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय आहे खिचडी घोटाळा? ज्यात ED ने संजय राऊत यांच्या भावाला नोटीस पाठवली