पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्रासमोर जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत अनेक आरोप केले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जम्मू काश्मीर भारताचा भाग असल्याचं सांगितलं. “आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमं, संस्था, एनजीओ यांना भारताच्या जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश का दिला जात नाही?,” असं त्यांनी म्हटलं आहे. यामुळे एकाप्रकारे त्यांनी जम्मू काश्मीर भारताचाच भाग असल्याची कबुली दिल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर पाकिस्ताननने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेसमोर भारताविरोधात ११५ पानांचं डॉजिअर सादर करत भारतावर खोटे आरोप लावले आहेत. भारताने मानवाधिकारांचं उल्लंघन केलं असल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.