जम्मू काश्मीरमधील माछिल सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा सैन्याने खात्मा केला. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून गेल्या १५ दिवसांत सीमा रेषेवर तिसऱ्यांदा घुसखोरीचा डाव उधळून लावण्यात आला आहे. माछिल सेक्टरमध्ये मंगळवारी रात्री उशीरा सीमा रेषेवर तीन दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे सैन्याच्या गस्ती पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता घनदाट जंगलाचा फायदा घेत दहशतवाद्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर दहशतवादी आणि सैन्यामध्ये चकमक झाली आणि या चकमकीत तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. परिसरात शोधमोहीम सुरु आहे.