राज्यसभेच्या 58 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या दहा जागांच्या निवडणुकीत नऊ जागा जिंकल्या.
उत्तर प्रदेशातील दहाव्या जागेवर समाजवादी पक्षाच्या जया बच्चन विजयी झाल्या. जया बच्चन यांनी 38 मतांनी बाजी मारत सलग चौथ्यांदा राज्यसभेचं खासदारपद भूषवलं. यूपीमध्ये भाजपचं समर्थन असलेले अपक्ष उमेदवार अनिल अग्रवाल यांनी बहुजन समाजवादी पक्षाच्या भीमराव आंबेडकर यांचा पराभव केला.
अरुण जेटली, अनिल जैन, व्हीपीएस तोमर, अशोक बाजपेयी, एस डी राजभर, जीव्हीएल नरसिम्हा राव, कांता करदम, एच एस यादव यांनी उत्तर प्रदेशात विजय मिळवला. विजयानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
यूपीशिवाय पश्चिम बंगालमधील 5, कर्नाटकच्या 4, तेलंगणाच्या 3, झारखंडच्या 2, तर छत्तीसगड आणि केरळमधील प्रत्येकी एका जागेचा निकाल हाती आला. कर्नाटकात काँग्रेसने 3 तर भाजपने 1 जागा मिळवली.
गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, ओडिसा, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांत 33 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
महाराष्ट्रात 6 जागांसाठी निवडणूक बिनविरोध झाली. महाराष्ट्रात भाजपकडून प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधरन, काँग्रेसकडून कुमार केतकर, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण आणि शिवसेनेकडून अनिल देसाई राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत.