Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्योतिरादित्य शिंदेंच्या भाजप प्रवेशानं त्यांची ताकद वाढलीय की कमी झालीय? – ग्राऊंड रिपोर्ट

ज्योतिरादित्य शिंदेंच्या भाजप प्रवेशानं त्यांची ताकद वाढलीय की कमी झालीय? – ग्राऊंड रिपोर्ट
, सोमवार, 18 सप्टेंबर 2023 (20:22 IST)
सलमान रावी
काँग्रेसने 2018 मध्ये भारतीय जनता पक्षाचा बाल्लेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ग्वाल्हेर-चंबळ या भागात 34 पैकी 26 जागा जिंकून मध्य प्रदेशात सत्ता मिळवली होती.
 
या विजयाचं कारण होतं की, तत्कालीन भाजप सरकारच्या विरोधात आलेली ‘सत्ताविरोधी लाट’.
 
काँग्रेस 2003 पासून या विजयाची वाट पाहात होतं.
 
या विजयाचं श्रेय जोतिरादित्य शिंदे यांना मिळालं. त्यांचे समर्थक खूप आनंदी होते. त्यांना आशा होती की, शिंदेंना मध्य प्रदेशाच्या राजकारणातलं सर्वात मोठं पद मिळेल.
 
पण ग्वाल्हेर-चंबळ या प्रदेशात मिळालेल्या दणदणीत विजयानंतरही काँग्रेसचे दोन वरिष्ठ नेते कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांच्यासमोर जोतिरादित्य शिंदे यांचं काही चाललं नाही.
 
त्यांना वाटलं की मुख्यमंत्री नाही तर निदान प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होतील. पण तसंही झालं नाही.
 
मग राज्यसभेत जाण्याची वेळ आली, तेव्हा त्यांच्याहून मोठ्या असणाऱ्या दिग्विजय सिंह यांची वर्णी लागली.
 
काँग्रेसवर नाराजी
या सगळ्या घटना घटनांनंतर असं दिसायला लागलं की शिंदे आपल्या पक्षावर नाराज आहेत. ग्वाल्हेर-चंबळ भागातल्या राजकारणात शिंदे घराणं अनेक दशकांपासून केंद्रस्थानी आहे. काँग्रेसच्या राजकारणाचं केंद्रही हाच भाग आहे.
 
ग्वाल्हेरचे जेष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रमोद भार्गव म्हणतात की, नगरसेवकाचं तिकीट असो वा खासदारकीचं सगळ्या उमेदवारांची याची शिंदे महालातून प्रसिद्ध व्हायची.
 
पण 2019 मध्ये शिंदे यांचा गुना लोकसभेच्या जागेवर आपलेच माजी सहकारी केपी यादव यांच्याकडून पराभव झाला. यादव भाजपच्या तिकिटावर लढले होते.
 
यानंतर जे घडलं ते अनेक दशकं घडलं नव्हतं. शिंदे कुटुंबाने काँग्रेसशी असणारं आपलं नातं संपवलं.
 
जोतिरादित्य शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह भाजपत गेले. यामुळे मध्यप्रदेशातलं 15 महिन्यांचं कमलनाथ सरकार पडलं.
 
जोतिरादित्य शिंदे समर्थक आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि पोटनिवडणुका जिंकून निवडून आले. त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदेंना भाजपने राज्यसभेत पाठवलं आणि केंद्रीय मंत्रीपद दिलं.
 
शिंदे भाजपात जाताना ग्वाल्हेर-चंबळ प्रदेशात काँग्रेस संपली. भाजप आधीपेक्षा जास्त मजबूत झाला. ज्या शिंदे घराण्याविरोधात भाजप राजकारण करायचा तेच घराणं या पक्षात सहभागी झालं.
 
‘भाजप आणि शिंदे समर्थकांचं नातं’
भार्गव म्हणतात, “भाजपने मध्य प्रदेशात सत्ताबदल केला. पण फार दिवस याचा परिणाम टिकला नाही. काही काळाने भाजपमध्ये आलेले शिंदे समर्थक आणि पक्षाचे जुने कार्यकर्ते तसंच नेते यांच्यात 36 चा आकडा तयार झाला.”
 
वीरेंद्र रघुवंशी शिवपुरीच्या कोलारस जागेवरून आमदारकी जिंकले. ते शिंदे समर्थकांनी पक्षांचा ताबा घेतला असा आरोप करतात.
 
रघुवंशी यांनी जेव्हा बीबीसीशी बातचित केली तेव्हा ते भाजपात होते. पण त्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला.
 
त्यांनी म्हटलं की जोतिरादित्य शिंदेंबरोबर जे नेते भाजपात आले त्यांनी भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची ‘दडपशाही’ केली आणि त्यांच्यावर ‘खोट्या केसेस’ दाखल केल्या.
 
ते म्हणतात, “जे काँग्रेसमधून आले ते संघटनेचा ताबा घेत गेले आणि आम्ही फक्त त्याग करत राहिलो. मी आडपडदा न ठेवता खरं सांगतोय. आम्हाला पक्षाने सांगितलं तुम्ही त्याग करा.”
 
ते पुढे म्हणतात, “आमची उपेक्षा झाली, शोषण झालं. मला दुःख या गोष्टीचं आहे की पक्षाने जुन्या कार्यकर्त्यांचा त्रास समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. सरकार स्थापन केल्यामुळे शिंदेंसमोर आमची आमच्याच पक्षात काही किंमत राहिली नाही. “
 
भाजप खासदाराचा बदललेला पवित्रा
तसं तर भाजपचे गुनाचे खासदार केपी यादव यांनीही पक्षाविरोधात आवाज बुलंद केला होता. त्यांची वक्तव्यं माध्यमात चर्चिली गेली. पण नंतर पक्षाच्या सांगण्यावरून त्यांनी ‘परिस्थितीशी तडजोड’ केली.
 
आम्ही त्यांना अशोक नगर जिल्ह्यात भेटलो. यावेळी त्यांनी आपला पवित्रा बदलला होता.
 
ते म्हणाले, “मी लहानपणापासून पाहातोय. राजमाता साहेबही या भागात लोकांना भेटायला नेहमी यायच्या. कै. माधवराव शिंदेही इथे यायचे आणि आता माननीय जोतिरादित्य शिंदेही लोकांना भेटायला इथे येतात. मी निवडणूक काँग्रेसच्या विरोधात लढली होती. त्यावेळी शिंदे त्यांचे उमेदवार होते. आता ते आमच्यासोबत आहेत. आम्ही एकत्र येऊन ते सगळं करू जे पक्षाच्या भल्याचं असेल.”
 
फक्त रघुवंशी नाही भाजपच्या अनेक जुन्या नेत्यांनी काँग्रेसचा हात धरला आहे. बरेच शिंदे समर्थक नेतेही काँग्रेसमध्ये परत गेले आहेत.
 
प्रमोद भार्गव म्हणतात, “भाजपत अनेक गट पडले आहेत. एका गटात आहेत भाजपचे जुने नेते ज्यांना आपली उपेक्षा होतेय असं वाटतं. एक गट आहे शिंदेंचा आणि एक गट आहे शिवराज सिंह चौहान यांच्याशी एकनिष्ठ असणाऱ्या नेत्यांचा.”
 
भाजपचं डॅमेज कंट्रोल
भाजपनेही आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी या प्रदेशातले आणखी एक ताकदवान नेते आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना पक्ष संघटनेची जबाबदारी दिली आहे. पण विश्लेषकांना वाटतं की यामुळे पक्षात आणखी एक नवा गट पडला आहे.
 
दुसरीकडे जोतिरादित्य शिंदेंच्या समर्थकांना वाटतं की जे लोक भाजपची साथ सोडून जात आहेत त्यांच्यामुळे निवडणुकांच्या निकालावर काही परिणाम होणार नाही. त्यांना असंही वाटतं की जोतिरादित्य शिंदे एक ना एक दिवस मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री जरूर बनतील.
 
शैलेंद्र सिंह आधी काँग्रेसमध्ये होते मग ते जोतिरादित्य शिंदेंसोबत भाजपत आले.
 
ते दावा करतात की शिंदे भाजपत आल्याने ग्वाल्हेर – चंबळ प्रदेशात पक्ष संघटनेला आणखी मजबूती मिळाली आहे.
 
ते म्हणतात, “भाजपमध्ये जो खड्डा होता, जी कमतरता होती ती आता भरून निघालीये.”
 
शिंदे समर्थकांची आशा
शिंदे यांच्या मतदार संघातले आणखी एक मोठे नेते आहेत आनंद रघुवंशी. ते पक्षाचे सरचिटणीस आहेत. त्यांच्याशी बोलल्यानंतर स्पष्ट लक्षात आलं की जर भाजप आता येत्या निवडणुकीत विजयी झाला तर मुख्यमंत्री जोतिरादित्य शिंदेच व्हावेत असं त्यांच्या समर्थकांना वाटतं. शिवराज सिंह चौहान परत मुख्यमंत्री व्हावेत असं त्यांना वाटत नाही.
 
ते म्हणतात, “सामान्य माणसाला वाटतं की शिंदे साहेबांना खूप मोठ्या पदावर बसवलं जावं. त्यांच्या हाती मध्य प्रदेशची धुरा दिली जावी. शिवराज सिंह यांनी आत्तापर्यंत प्रदेशासाठी खूप चांगली कामं केली आहेत पण आमची इच्छा आहे की त्यांच्या कामांवर शिंदेंनी मुख्यमंत्री बनून कळस चढवावा.”
 
या भागातल्या लोकांनाही येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये बराच रस आहे. शिंदे घराण्याच्या राजकारणातही इथल्या लोकांना रस आहे.
 
मॉर्निंग वॉक करता करता आम्हाला भेटले महेश. त्यांचे वाडवडील शिंदे संस्थानिकांची प्रजा होते. त्यांचं कुटुंब शिंदे सरकारांनी दिलेल्या जमिनीवरच घर बांधून राहातंय.
 
त्यांना वाटतं की, ‘राजे’ आता भाजपत गेल्यामुळे पूर्ण निवडणूक आता एकतर्फी होणार आहे.”
 
आम्हाला इकडे फिरताना नीरजही भेटला जो या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणार आहे. तो 21-वर्षांचा आहे. त्यालाही वाटतं की या निवडणुका रंजक असतील कारण जोतिरादित्य शिंदे भाजपमध्ये गेल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक असेल.
 
तो म्हणतो, “भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी कोणता चेहरा पुढे केलेला नाही. त्यामुळे जर भाजपने निवडणूक जिंकली तर शिंदेही मुख्यमंत्री होऊ शकतात.”
 
जोतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये असताना त्याचा फायदा काँग्रेसला व्हायचा. त्यामुळे शिंदे आता भाजपत गेल्याने काँग्रेसला नुकसान होतंय.
 
जोतिरादित्य शिंदे यांचा प्रभाव
काँग्रेस आमदार आणि दिग्विजय सिंह यांचे भाऊ लक्ष्मण सिंह आम्हाला राघोगढमध्ये भेटले.
 
ते म्हणतात, “शिंदे कुटुंबाचं वर्चस्व कायमच या प्रदेशात होतं, आजही आहे. आता ते भाजपमध्ये गेले असले तरीही त्यांचा प्रभाव कायम आहे. जोवर ते काँग्रेसमध्ये होते तोवर काँग्रेसला यांचा फायदा झाला. त्यांचे वडील माधवरावजी महाराज जिवंत होते तेव्हाही काँग्रेसला फायदा झाला. आता जोतिरादित्य भाजपत गेलेत तर त्यामुळे भाजपला फायदा होताना दिसतोय. त्यांचं सरकार आहे आणि त्यांना पुढेही फायदा होईल.”
 
पण जोतिरादित्य यांचे माजी संसद प्रतिनिधी असणाऱ्या अमित शर्मांना असं वाटत नाही. त्यांना वाटतं की त्यांच्या ‘राजांनी’ काँग्रेस सोडण्याचा निर्णय घाईघाईने घेतला.
 
ते म्हणतात, “राजे काँग्रेसमध्ये असते तरी त्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी होती. त्यांनी फक्त थोडी वाट पहायला पाहिजे होती. मला नाही वाटत की भाजप त्यांना एवढ्या लवकर मुख्यमंत्री बनण्याची संधी देईल.”
 
राजकीय विश्लेषकांना वाटतं की हा काळ जोतिरादित्य सिंधिया यांच्या अग्निपरीक्षेचा आहे.
 
येणाऱ्या निवडणुका त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी फारच महत्त्वाच्या ठरतील. जर शिंदेंच्या नेतृत्वाखाली जर या भागात भाजपचा पराभव झाला तर त्यांचं राजकीय महत्त्व घटेल.
 
प्रमोद भार्गव म्हणतात, “भाजपत आल्यानंतर शिंदेंना राज्यसभेची सदस्यता दिली गेली. त्यांना केंद्रीय मंत्रीपद दिलं गेलं. त्यांचं दिल्लीतलं घरही त्यांना परत मिळालं. पण या सगळ्या तात्पुरत्या सोयी आहेत. पण यापुढचा प्रवास त्यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.”
 
काँग्रेसचे प्रयत्न
याच दरम्यान ग्वाल्हेर-चंबळ भागातून पूर्णपणे पराभव झाल्यानंतर काँग्रेसने आणखी एकदा आपली संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रदेशात काँग्रेसचा पत्ताही शिंदेंचा महालच होता. त्यामुळे काँग्रेसला इथे शून्यातून सुरुवात करावी लागतेय.
 
काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंहही राघोगढचे राजे आहेत. पण शिंदे घराण्याइतका वरचष्मा त्यांचा कधीच नव्हता. आता जोतिरादित्य शिंदे भाजपत गेल्यानंतर रिकामी झालेली जागा भरून काढण्यासाठी राघोगढ पूरेपूर प्रयत्न करतंय.
 
दिग्विजय सिंह यांचे पुत्र जयवर्धन सिंह राघोगढचे आमदार आहेत. शिंदेंनी भाजपात गेल्यानंतर लगेचच जयवर्धन यांनी लोकांत मिसळायला सुरुवात केली. त्यांनी आपला प्रभाव वाढवण्यासाठी या भागात पूर्ण ताकद लावली आहे.
 
भार्गव आणि इतर राजकीय विश्लेषकांना वाटतं की ग्वाल्हेर-चंबळ प्रदेश शिंदेंचा बालेकिल्ला आहे हे जरी खरं असलं तरी 2019 पासून जयवर्धन या बालेकिल्ल्यांचे बुरुज ढासळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
 
भार्गव म्हणतात, “जयवर्धन सिंह सतत ग्वाल्हेर-चंबळ भागाचा दौरा करत आहेत. ज्या दिवशी भाजपचे नेते जितेंद्र जैन गोटू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याच्या दुसऱ्याच दिवशी जयवर्धन सिंह यांनी बदरवास भागात मोठा कार्यक्रम केला. मी इतक्या दशकांपासून पत्रकारिता करतोय. मी एकदाच जोतिरादित्य शिंदेंच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी पाहिली होती जेव्हा ते माधवराव शिंदेंच्या मृत्युनंतर इथे आले होते. त्यानंतर एवढी गर्दी आताच्या जयवर्धन सिंह यांच्या कार्यक्रमाला जमली.”
 
आता काँग्रेसचं पुढे काय होणार?
सगळ्यांच लोकांना आता कुतुहल आहे की काँग्रेसचं पुढे काय होणार? काँग्रेस पुढे काय करणार? मुख्य म्हणजे शिंदे घराण्याशिवाय ग्वाल्हेर-चंबळ भागात काँग्रेसचं काही अस्तित्व राहाणार का?
 
या प्रश्नाचं उत्तर देताना मध्यप्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आरपी सिंह म्हणतात की वडाच्या झाडाखाली इतर झाडं वाढू शकत नाहीत तसंच शिंदे पक्षात असताना दुसऱ्या नेत्याला महत्त्वाची जागा मिळण्याची शक्यता नव्हती.
 
ते म्हणतात, “शिंदे गेल्यानंतर आता काँग्रेसला निष्ठावान असलेले अनेक नेते आणि कार्यकर्ते समोर आलेत आणि त्यांनी पक्ष संघटना नव्याने उभी करण्याचा चंग बांधला आहे.”
 
ते पुढे म्हणतात, “आमचे नेते कुशल आहेत. शिंदे आता काँग्रेस सोडून गेलेत तर भाजपला वाटलं की त्यांच्याकडे मोठं बळ आलंय. ते आणखी मजबूत झालेत. पण प्रत्यक्षात परिस्थिती याच्या एकदम विपरित आहे. हे सगळं घडल्यानंतरही 57 वर्षांत पहिल्यांदा ग्वाल्हेरमध्ये आमचा महापौर बनला. आमची नगरपालिका निवडणुकीत चांगली कामगिरी केली. मुरैनातही आमचा महापौर आला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हा पक्ष जो फक्त एका घरातून किंवा महालातून चालायचा तो आता संघटनात्मक पद्धतीने चालतोय.”
 
शिंदे कुटुंबाचं राजकारण
शिंदे घराण्याच्या सक्रिय राजकारणाची सुरुवात 1962 साली झाली. यावेळी राजे जिवाजीराव शिंदेंच्या विधवा पत्नी राजमाता विजयाराजे शिंदे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली.
 
याआधी भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेव्हा ग्वाल्हेर संस्थानाचं भारतात विलिनीकरण झालं त्यानंतर जिवाजीराव शिंदे मध्य प्रांत या राज्याचे राज्यपाल बनले.
 
1948 ते 1956 या काळात ते मध्य प्रांताचे राज्यप्रमुख/राज्यपाल होते. मग मध्य प्रांतांचही भारतात विलिनीकरण झालं.
 
यानंतर राजमाता विजयाराजे यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपच्या संस्थापकांपैकी त्या एक ठरल्या. त्यांच्या दोन्ही मुलींनीही राजकारणात प्रवेश केला. वसुंधराराजे शिंदे पाच वेळा भाजपच्या खासदार होत्या तर दोनदा राजस्थानच्या मुख्यमंत्री झाल्या.
 
तर यशोधराराजे शिंदे दोनदा भाजपच्या खासदार होत्या. सध्या त्या मध्यप्रदेश सरकारमध्ये मंत्री आहेत.
 
विजयाराजे शिंदेंचे पुत्र माधवराव यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जनसंघापासून केली. 1971 साली ते खासदार बनले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
 
जोतिरादित्य शिंदे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली पण आता ते भाजपत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Asia cup: रोहित विसरला पुन्हा पासपोर्ट