कर्नाटका विकास प्राधिकरणने बँकेत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना येत्या ६ महिन्यात कानडी शिका नाहीतर नोकरी सोडा अशा स्वरुपाची धमकीवजा नोटीस दिली आहे. कानडी बोलू न शकणाऱ्या प्रादेशिक प्रमुखांना हे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कर्नाटकमधील राष्ट्रीय, खासगी आणि ग्रामिण अशा सर्व बँकांमध्ये हे आदेश देण्यात आले आहेत.
बँकेचे दैनंदिन व्यवहार स्थानिक भाषेमध्ये होणे आवश्यक असल्याचे प्राधिकरणनाने यावेळी स्पष्ट केले. अशाप्रकारे स्थानिक भाषेचा वापर केल्यास जास्तीत जास्त लोक बँक सेवेचा लाभ घेऊ शकतील. विशेषतः ग्रामिण भागात भाषेची समस्या भेडसावत असल्याने बँकेतील अधिकाऱ्यांना कानडी येणे क्रमप्राप्त आहे असेही स्पष्ट केले. वर्षाच्या सुरुवातीला एक ग्राहकाने चेकवर कानडीमध्ये माहिती लिहीली होती आणि त्याचा चेक नाकारण्यात आला. यावरुन हा ग्राहक बॅंकेविरोधात न्यायालयात गेला होता.