कर्नाटकातील लिंगायत मठाचे प्रमुख शिवमूर्ती मुरुगा शरणरू यांच्यावर संस्थेतील अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवमूर्ती यांच्यावर आरोप झाल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवमूर्तींनी हे आरोप फेटाळले असून हा आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे असे त्यांनी म्हटले आहे.
शिवमूर्तींनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याआधी त्यांच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली होती.
दरम्यान लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या या दोन मुलींनी मंगळवारी सीआरपीसीच्या कलम 164 अंतर्गत न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आपला जबाब नोंदवला आहे.
ही तक्रार म्हैसूर शहर पोलीस स्टेशनमधून आता चित्रदुर्ग येथे वर्ग करण्यात आली आहे. संत शिवमूर्ती हे चित्रदुर्ग येथील लिंगायत मठाचे प्रमुख संत आहेत.
लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितेच्या आईने महिला व बालकल्याण विभागाला त्या अनुसूचित जातीतून असल्याची माहिती दिली.
चित्रदुर्गचे पोलीस अधीक्षक के. परशुराम यांनी या प्रकरणावर बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "पीडितेच्या आईने अनुसूचित जातीतून असल्याची माहिती दिल्यामुळे शिवमूर्ती स्वामींवर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
'स्वामींवरील आरोप निराधार'
स्वामीजींवर लावण्यात आलेले आरोप निराधार असल्याचं मठाचे वकील एनबी विश्वनाथन यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं.
स्वामीजींविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीत असं म्हटलंय की ते मठामार्फत चालवल्या जाणार्या शाळेत शिकणार्या मुलींचं लैंगिक शोषण करायचे.
ओडांडी सेवा समस्तेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या परशुराम एमएल यांनी याप्रकरणी बीबीसी हिंदीला सविस्तर माहिती दिली. ते सांगतात, "या दोन्ही ठिकाणीही मुलींच्या पदरी निराशाच पडली. शेवटी त्या दोघींनीही आपलं घर गाठलं. या मुली जेव्हा झोपेतून दचकून जाग्या व्हायला लागल्या, शाळेत जायला टाळाटाळ करू लागल्या तेव्हा मात्र त्यांच्या आई वडिलांना या प्रकरणाची तीव्रता समजली."
शेवटी या मुलींच्या पालकांनी बालविकास आणि संरक्षण विभागाशी संपर्क साधला. आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी म्हैसूर येथील नजराबाद पोलिसांत तक्रार दाखल केली.
त्यांच्या तक्रारीनंतर स्वामी शिवमूर्ती मुरुगा शरणरू आणि संबंधित इतरांविरोधात पॉक्सो ऍक्टच्या कलम 5 (सहवास करण्याचा प्रयत्न), आयपीसीच्या कलम 376 (सी) (एन) (त्याच महिलेवर वारंवार बलात्कार), कलम 376 (3) (16 वर्षाखालील मुलींवर बलात्कार) आणि कलम 149 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
वसतिगृहाच्या वॉर्डनसह पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच हे प्रकरण चित्रदुर्ग इथं घडलं असल्यामुळे केस ट्रान्स्फर करण्यात आली.
पुढे चित्रदुर्ग पोलिसांनी या प्रकरणात मठाचे प्रशासकीय अधिकारी एस. के. बासवराजन यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि गैरवर्तनाच्या आरोपाखाली तक्रार नोंद केली.
या गुन्ह्यात त्यांच्या पत्नीलाही सहआरोपी करण्यात आलं आहे. बासवराजन हे जनता दल-एसचे माजी आमदार आहेत. तर त्यांच्या पत्नी सौभाग्या या जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षा होत्या.
मठात राहणाऱ्या एका मुलीने आपल्या तक्रारीत म्हटलंय की, "27 जुलैच्या संध्याकाळी 6 वाजता बासवराजन मुलींच्या वसतिगृहात आले होते. त्यांनी माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मी त्यांना विरोध केल्यावर ते भडकले आणि त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली."
या मुलीने आपल्या तक्रारीत म्हटलंय की, मुलींना वसतिगृहाबाहेर नेण्याचा प्रयत्न सुरू होता. याबाबत मी विचारणा केली होती म्हणूनच त्यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केला.
या प्रकरणात आयपीसीच्या कलम 354 ए (महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान करणे), कलम 506 (गुन्हा करण्याच्या हेतूने रोखणे) आणि कलम 504 (व्यक्तीचा जाणूनबुजून अपमान) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वामीजी आणि राजकारण
हे प्रकरण समोर आल्यानंतर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी डॉ. शिवमूर्ती स्वामींचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, "स्वामीजींवर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असून हे स्वामीजींच्या विरोधात रचलेलं षडयंत्र आहे. त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसून ते निर्दोष सुटतील."
मात्र मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मात्र सावध पवित्रा घेत तपासानंतरच सत्य बाहेर येईल असं म्हटलंय.
तेच दुसरीकडे डॉ. शिवमूर्ती मुरुगा शरणरू यांनी आपल्या अनुयायांना शांत राहण्याचं आवाहन केलंय. ते म्हणाले, "माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी रचलेलं हे षड्यंत्र आहे." आपण पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितलं.
लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून घोषित करण्याच्या काँग्रेसच्या प्रस्तावाला शिवमूर्ती स्वामींनी समर्थन दिलं होतं. तसेच मागच्या महिन्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकचा दौरा केला होता. त्यावेळी शिवमूर्ती स्वामींनी राहुल गांधींना लिंगायत धर्माची दीक्षा दिली होती. राहुल गांधी यांनी लिंगायत संप्रदायाच्या प्रथेनुसार गळ्यात लिंग धारण केले. हा माझा मोठा सन्मान आहे असे राहुल गांधी यावेळी म्हणाले होते.
संत बसवेश्वरांनी ब्राह्मण्यवादाला तसेच वैदिक कर्मकांडाला नेहमीच विरोध केला होता. मुरुगा मठाने सुद्धा संत बसवेश्वरांनी आखून दिलेल्या या सुधारणावादी मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला आहे.