विस्थापित काश्मिर पंडितांच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल, तसेच प्रसंगी प्रवेशाच्या जागा वाढविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत, असे सामंत यांनी सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते.
काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांवरील अत्याचारांत वाढ झाल्याने त्यांनी स्थलांतर केले आहे. अनेकजण जम्मूमध्ये स्थलांतरीत होत असून अनेकांनी इतर मार्ग अवलंबले आहेत. त्यामुळे विस्थापित झालेल्या काश्मिर पंडितांच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्राधान्याने प्रवेश देण्यात येतील, अशी घोषणा आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.
गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. आतापर्यंत आठ हत्या झाल्या असून यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. दहशतवाद्यांनी माजवलेल्या दहशतीमुळे तेथील काश्मीर पंडित स्थलांतरीत होत आहेत. त्यामुळे विस्थापित झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये याकरता राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय गेतला आहे. तसेच, प्रवेश प्रक्रिया करताना जागा कमी पडू नयेत म्हणून जागा वाढविण्यात येणार असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले.