Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लखीमपूर खिरी : प्रियांका गांधी 'अटकेत,' अखिलेश यादवही पोलिसांच्या ताब्यात

लखीमपूर खिरी : प्रियांका गांधी 'अटकेत,' अखिलेश यादवही पोलिसांच्या ताब्यात
, सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (11:22 IST)
लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणी लखनौमध्ये आपल्या घरासमोर निदर्शनास बसलेले उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
 
या घटनेनंतर समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप गोँधळ घातला. त्यानंतर अखिलेश यांनी कार्यकर्त्यांना पोलिसांच्या कामात अडथळ न आणण्याचं आवाहन केलं.
 
अखिलेश यांच्याशिवाय समाजपवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव आणि 150 ते 200 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
 
सोमवारी सकाळी 9 वाजता अखिलेश यादव लखीमपूर खिरी जाण्यासाठी घरातून निघाले होते. पण, पोलिसांना त्यांना रोखलं, त्यानंतर मात्र ते घराबाहेरच निदर्शनास बसले होते.
webdunia
दरम्यान, लखीमपूर खिरीमध्ये आंदोलक शेतकऱ्यांनी आयजी लखनऊ रेंज लक्ष्मी सिंह यांच्याबरोबर 45 मिनिटं चर्चा केली. यावेळी पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकही उपस्थित होते.
 
लवकरच याप्रकरणी तोडगा निघेल आणि निदर्शनं संपुष्टात येतील, असं माध्यमांशी बोलताना लक्ष्मी सिंह यांनी सांगितलं.
 
शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर 4 मागण्या ठेवल्या आहेत. यात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांची हकालपट्टी करावी, त्यांच्या मुलाला अटक करावी, पीडितांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई द्यावी आणि सरकारी नोकरी द्यावी, या मागण्या आहेत.
 
या मागण्यांव्यतिरिक्त शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर इतरही काही मागण्या केल्या आहेत.
 
या घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
 
अजय मिश्र टेनी यांच्या मुलाविरोधात एफआयआर दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
 
तर टेनी यांनी म्हटलंय की, या घटनेत माझा मुलगा सहभागी नव्हता, त्याची कार तेवढी घटनास्थळी होती. या घटनेत आमच्या कार्यकर्त्याचाही मृत्यू झाला आहे.
 
टेनी यांनी रात्री उशीरा ट्वीट करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
webdunia
एका व्हीडिओत त्यांनी असंही म्हटलंय, "आमच्याकडे ही माहिती होती की काही शेतकरी शांतपणे आंदोलन करत आहेत. त्यामुळे प्रशासनानं आमचा मार्ग दुसरीकडे वळवण्यात आला. त्याचवेळी, शेतकऱ्यांमध्ये लपलेल्या काही बेशिस्त घटकांनी भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर लाठ्यांनी हल्ला केला. आमच्याकडे त्याचा एक व्हिडिओ आहे."
 
दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा रात्री उशीरा लखीमपूर खिरीमध्ये आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघाल्या होत्या.
 
पण यूपी प्रशासनानं त्यांना तिथं जाण्यापासून रोखल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
 
"शेतकऱ्यांना नेस्तनाभूत करण्याचं राजकारण हे सरकार करत असल्याचं या घटनेवरून दिसून येत आहे, हा शेतकऱ्यांचा देश आहे भाजपचा नाही. पीडित शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना भेटून मी कुठलाही गुन्हा करत नाहीये. तुम्ही मला का थांबवत आहात, तुमच्याकडे वॉरंट आहे का," असा सवाल प्रियांका गांधी वाड्रा यांनी विचारला आहे.
 
तर दुसराकडे प्रियांका यांना हरगाव जवळ अटक करण्यात आल्याचं यूथ काँग्रेसचे अध्यक्षचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी ट्वीट करून म्हटलंय.
 
हा शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा रानटी प्रकार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
 
या घटनेचा मी निषेध करतो, असंही त्यांनी ट्वीट करून म्हटलंय.
 
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आज लखीमपूर खिरी इथं जाणार आहेत. त्यांच्या घराबाहेर सध्या पोलिसांचा फौजफोटा तैनात करण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लखीमपूर खीरीमध्ये गोंधळ: आतापर्यंत 8 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, राकेश टिकैत म्हणाले - शेतकऱ्यांवर गाडी चालवण्याची सरकारची पूर्व योजना