कोळसा घोटाळ्यात दोषी ठरलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शनिवारी तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि २५ लाख रुपये दंड सुनावला आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा, माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता, झारखंडचे माजी मुख्य सचिव अशोक कुमार बसू आणि अन्य एकाला गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी कलम १२० बी अंतर्गत दोषी घोषित केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्यांना शिक्षा सुनावली जाणे अपेक्षित होते. मात्र, १६ डिसेंबरपर्यंत शिक्षेची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती.
दरम्यान, कोडा यांनी न्यायालयाकडे आपली शिक्षा कमी करण्यात यावी अशी विनंती केली होती. आपण आरोग्यसंबंधी समस्यांनी ग्रस्त आहोत. तसेच आपल्याला दोन लहान मुली असल्याने आपल्या विनंतीचा गांभीर्याने विचार करण्यात यावा अशी मागणी कोडा यांनी न्यायालयाकडे केली होती.