भारतीय हवामान खात्याकडून प्रसिद्ध झालेल्या सुचनेनुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महा (MAHA) चक्रीवादळामुळे दि. ६ नोव्हेंबर २०१९ ते ८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत उत्तर कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्राला मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे समुद्रामध्ये वाऱ्याचा वेग जास्त राहणार असल्याने मच्छिमारांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. मागच्या आठवड्यातच कोकण किनारपट्टीला क्यार वादळाचा तडाखा बसला होता.
समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना पुन्हा समुद्र किनारपट्टीवर येण्याचे देखील या सूचनेत कळविण्यात आले आहे. याबाबत योग्य त्या उपाययोजनेसह तयारीत राहण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्याचे व कोणत्याही मदतीसाठी मंत्रालय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आल्याचे मंत्रालय नियंत्रण कक्षाच्यावतीने कळविण्यात आले आहे.