Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

Dev Prakash Madhukar
, शनिवार, 6 जुलै 2024 (20:40 IST)
हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी या घटनेतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर यांना अटक केली आहे.
हाथरसचे पोलीस अधीक्षक निपुण अग्रवाल यांनी पत्रकारांना सांगितलं की सत्संगाचे मुख्य आयोजक देव प्रकाश मधुकर जे मुख्य आरोपी आहे त्यांच्यासह रामप्रकाश शाक्य आणि संजू यादव यांना अटक करण्यात आली आहे.
ही घटना झाल्यानंतर सहा लोकांना अटक करण्यात आली होती. या घटनेतील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर यांनी शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीच्या नजफगड भागातून अटक करण्यात आली.

मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर शनिवारी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यांच्या पोलीस त्यांच्या रिमांडचीही मागणी कोर्टासमोर करतील.उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 121 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
आग्रा विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक कार्यलयानं या संख्येला दुजोरा दिला आहे. मात्र, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आल्यानं नेमकी संख्या कळण्यास आणखी काही अवधी जाईल.
 
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या घटनेची दखल घेत काळजी व्यक्त केली.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. तसचं मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत, म्हटलं की, "सरकार आणि प्रशासनाला विनंती आहे की जखमींना शक्य ते सर्व उपचार आणि पीडित कुटुंबांना मदत द्यावी."
 
'चेंगराचेंगरी करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई व्हावी'
हाथरस मध्ये ज्यांचा सत्संग आयोजित करण्यात आला होता त्या बाबा नारायण साकार हरी यांनी एक पत्र प्रकाशित करून झालेल्या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे.
 
या पत्रात त्यांनी असं लिहिलं आहे की, "मी मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो."
 
या पत्रात त्यांनी पुढे लिहिलं की, "पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयाचे वकील डॉ. ए.पी. सिंग यांना नियुक्त केलं आहे. मी कार्यक्रमस्थळावरून गेल्यानंतर काही समाजकंटकांनी तिथे चेंगराचेंगरी केली, त्यांसंदर्भात कारवाई करण्यासाठीच मी एपी सिंग यांना अधिकृत केलं आहे."
नारायण साकार हरी यांचे वकील एपी सिंग म्हणाले की, "काही समाजकंटकांनी अगदी सुनियोजित कट रचून नारायण साकार हरी मंचावरून गेल्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ घातला आणि त्यातूनच चेंगराचेंगरी झाली त्याची चौकशी झाली पाहिजे. सरकार या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी करत आहे त्यासाठी त्यांचे आभार."
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की, "या संपूर्ण घटनेला जबाबदार असलेल्यांवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी पुढील कारवाई केली जाईल. प्राथमिक तपासानंतर ही कारवाई पुढे सरकेल. या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण आहे हे शोधण्यासाठी सखोल चौकशी करावी लागेल."
 
बाबांविरुद्ध एफआयआर नसल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याची व्याप्ती वाढवली जाईल.
 
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
घटनास्थळी उपस्थित असलेल्या ब्रजेशनं स्थानिक पत्रकार धर्मेंद्र यांच्याशी बोलताना सांगितलं की, "सत्संगाचा कार्यक्रम संपल्यानंतर लोक भोले बाबांच्या पायाची धूळ घेण्यासाठी धावले. मात्र, बाबा दुसरीकडेच निघून गेले होते, मग लोक त्या दिशेनं धावत गेले. या सगळ्या गोंधळात रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडले आणि मोठी चेंगराचेंगरी झाली. यामुळे काही लोक चिरडले गेले."
 
"मृतांमध्ये जास्तीत जास्त महिला आणि लहान मुलं आहेत. आयोजक आणि स्थानिक लोकांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये नेण्यास सुरुवात केल्यानंतर, घटनेच्या अर्ध्या तासात पोलीसही घटनास्थळी पोहोचले," असंही ब्रजेश यांनी सांगितलं.
श्री दयाल नावाच्या आणखी एका व्यक्तीनं सांगितलं की, ते आणि त्यांचे भाऊ सौदान हे प्रवचन ऐकण्यासाठी आले होते. मात्र, या घटनेनंतर त्यांच्या भाऊ सापडतच नाहीय.
 
श्री दयाल म्हणाले की, "कार्यक्रम संपल्यानंतर जेव्हा लोक निघू लागले, तेव्हा चेंगराचेंगरी झाली आणि अनेक लोक त्यात चिरडले गेले. माझा भाऊही सापडत नाहीय."
आतापर्यंत काय माहिती समोर आलीय?
हाथरसचे पोलीस अधीक्षक निपुण अगरवाल म्हणाले की, अनेकजण यात जखमी देखील झाले आहेत.
 
मृतांमध्ये 20 पेक्षा अधिक महिलांचा समावेश असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
 
एटाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश कुमार सिंह यांनी सांगितलं, "एक दुखद घटना घडली आहे. हाथरस जनपद मधील सिकंद्राराऊ जवळच्या मुगलगढी गावात भोले बाबांचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळेस झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये लोकांचा मृत्यू झाला आहे."
 
ते म्हणाले की, प्राथमिक तपासातून कळालं आहे की धार्मिक कार्यक्रमाच्या वेळेस झालेल्या चेंगराचेंगरीमुळे हे घडलं आहे.
एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया व्यासपीठावर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयानं हाथरसमध्ये झालेल्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
 
त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलं आहे की, "जखमी लवकर बरे व्हावेत अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. जखमींना तत्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन योग्य ते उपचार करण्याच्या आणि घटनास्थळी वेगानं मदतकार्य करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आग्र्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी, आग्रा) आणि अलीगढचे आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली या दुर्घटनेची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत."
"सिकंद्राराऊ ट्रॉमा सेंटरमध्ये जखमींना नेण्यात येत आहे. एटाच्या हॉस्पिटलमध्ये 27 मृतदेह आले असून त्यात 23 महिला, तीन मुलं आणि एका पुरुषाचा मृतदेह आहे. जखमी अद्याप पोहोचायचे आहेत."
 
एटाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ, एटा) उमेश कुमार त्रिपाठी म्हणाले, "आतापर्यंत 27 मृतदेह पोस्ट मॉर्टम हाऊसमध्ये पोहोचले आहेत. यात 25 महिला आणि दोन पुरुष आहेत. अनेक जखमींना देखील दाखल करण्यात आलं आहे. चौकशीनंतर पुढील माहिती दिली जाईल."
बीबीसीचे सहकारी पत्रकार धर्मेंद्र चौधरी यांनी ट्रॉमा सेंटरमधून काही व्हीडिओ पाठवले आहेत. त्यामध्ये मृतांचे कुटुंबीय आक्रोश करताना दिसत आहेत.
 
ट्रॉमा सेंटरमध्ये असलेल्या मृतांपैकी एकाचा नातेवाईक म्हणाला, "इतकी मोठी दुर्घटना घडली आहे. मात्र एकही वरिष्ठ अधिकारी इथे पोहोचलेला नाही. भोले बाबांना इथे एवढा मोठा कार्यक्रम करण्याची परवानगी कोणी दिली होती. प्रशासन कुठे आहे?"
जखमी आणि मृतांना ट्रॉमा सेंटरमध्ये ट्रक, टेम्पो आणि अॅम्ब्युलन्सद्वारे आणण्यात आलं.
व्हीडिओमध्ये ट्रॉमा सेंटरच्या बाहेर महिलांचे मृतदेह फरशीवर ठेवलेले दिसत आहेत.
ट्रॉमा सेंटरच्या बाहेर गोंधळाचं वातावरण आहे आणि लोक आपल्या नातेवाईकांच्या शोधात तिथे येत आहेत.
 
दरम्यान उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री संदीप सिंह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की "मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हाथरसमधील घटनास्थळी जाण्याच्या आणि सरकारकडून आवश्यक निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मृतांची संख्या सातत्यानं वाढते आहे."
 
या दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हाथरस घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
 
"उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संग दरम्यान चेंगराचेंगरीमुळे अनेक भाविकांच्या मृत्यूची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. पीडित कुटुंबांसोबत आम्ही संवेदना व्यक्त करतो आणि मी जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्याची आशा करतो. सरकार आणि प्रशासनाला विनंती आहे की जखमींना शक्य ते सर्व उपचार आणि पीडित कुटुंबांना मदत द्यावी," असं गांधी यांनी सोशल मीडियाद्वारे म्हटलं आहे.

Published By- Priya Dixit
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नरेंद्र मोदी यांनी केले किएर स्टार्मर यांचे अभिनंदन, दोन्ही नेत्यांची फोनवर चर्चा