गेल्या अनेक महिन्यांपासून भाजप विरोधात विरोधी पक्ष एकत्र येण्याच्या शक्यतेची चाचपणी करत असतानाचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारण्यास नकार दिला होता.
पण कर्नाटकातील विजयानंतर ममता यांनी आपल्या भूमिकेत बदल करताना म्हटलं आहे की, काँग्रेस जिथे मजबूत आहे, तिथे तृणमूल काँग्रेस त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे. पण त्याबदल्याने काँग्रेसने बंगालमध्ये टीएमसीला मदत करावी.
नबन्ना इथे एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हटलं की, देशात लोकशाहीचे हक्क बुलडोझरने चिरडले जात आहेत. अशा स्थितीत त्या त्या प्रदेशात जो कोणी ताकदवान असेल, त्यांनी एकत्र येऊन लढा द्यायला हावा. आपण समजा बंगालमध्ये बलवान आहोत, तर बंगालमध्ये लढू. काँग्रेसने दिल्लीत लढावं, नितीशजी-तेजस्वीने बिहारमध्ये.
ज्या जागांवर काँग्रेस मजबूत असेल तिथे आमचा त्यांना पाठिंबा आहे, मात्र त्यासाठी काँग्रेसलाही इतर पक्षांना साथ द्यावी लागेल, असं ममता यांनी म्हटलं.लोकमतने ही बातमी दिली आहे.
Published By- Priya Dixit