Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मांढरदेवी ते हाथरस : धार्मिक कार्यक्रमातल्या चेंगराचेंगरीच्या घटनांचा असा आहे हृदयद्रावक इतिहास

मांढरदेवी ते हाथरस : धार्मिक कार्यक्रमातल्या चेंगराचेंगरीच्या घटनांचा असा आहे हृदयद्रावक इतिहास
, बुधवार, 3 जुलै 2024 (09:15 IST)
उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यात एका सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे की, हाथरस दुर्घटनेत जीव गमावलेल्यांचा आकडा अजून वाढू शकतो.
अशा प्रकारच्या धार्मिक कार्यक्रम, मेळावे, सत्संगामध्ये चेंगराचेंगरी होऊन लोक मृत्यूमुखी पडण्याच्या दुर्दैवी घटना यापूर्वीही झालेल्या आहेत.
2005 मध्ये सातारा जिल्ह्यातल्या वाईमधील मांढरदेवीच्या यात्रेत झालेली दुर्घटना विसरणं आजही शक्य नाही. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 340 लोकांनी आपले प्राण गमावले होते.
 
राजस्थानमधील चामुंडा देवीच्या मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 250 लोकांचा मृत्यू झाला होता. त्याच वर्षी हिमाचल प्रदेशातही नैना देवी मंदिरात अशाच दुर्घटनेत 162 लोकांचा मृत्यू झाला होता.
 
2003 साली इंदूर शहरात रामनवमीच्या उत्सवादरम्यान एका प्राचीन विहिरीवर लावण्यात आलेले दगडी स्लॅब तुटले. त्यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली आणि त्यात 36 लोकांचा मृत्यू झाला.
 
गेल्या काही वर्षांत कुठे-कुठे चेंगराचेंगरीच्या घटना झाल्या आणि त्यात किती लोकांना आपले प्राण गमवावे लागले हे जाणून घेऊया.
 
25 जानेवारी 2005 - मांढरदेवी दुर्घटना
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याजवळ मांढरदेवीचं मंदिर एका डोंगरावर वसलेलं आहे. याला काळुबाईचं मंदिर म्हणूनही ओळखलं जातं.
 
मांढरदेवीच्या मंदिरात जाण्यासाठी हा लहान डोंगर चढावा लागतो. त्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दुतर्फा पूजेच्या साहित्याची दुकानं आहेत.
दरवर्षी जानेवारी महिन्यात डोंगरावर मांढरदेवीची यात्रा असते. हा उत्सव जवळपास 15 दिवस चालतो.
'आपलं गाऱ्हाणं देवीसमोर मांडण्यासाठी, आपल्या इच्छापूर्तींसाठी आणि इच्छा पूर्ण झाली म्हणून दर्शनासाठी लाखो भाविक खासकरून यात्रेला हजेरी लावतात' अशी मान्यता आहे.
दरवर्षीप्रमाणे 'त्या' दिवशीही जवळपास 3 लाख भक्त उत्सवासाठी जमले होते. यात मोठ्या संख्येने महिला आणि त्यांच्यासोबत लहान मुलं होती.
 
उसळलेल्या गर्दीतून प्रत्येक जण जमेल तसं देवीचं दर्शन घेत होते. बोकड कापण्याची प्रथा सुद्धा त्यावेळी होती. त्यामुळे डोंगराच्या एकाबाजूला बोकड कापले जात होते.
 
दुपारच्यावेळी गर्दीत अचनाक गोंधळ उडाला. काही भाविक घसरून खाली पडले आणि गर्दी असल्याने चेंगराचेंगरी झाली. यावेळी डोंगरावर काही तंबू लावले होते. या तंबूंनाही आग लागली. सिलेंडरचा स्फोट झाला आणि शेकडोंचा बळी गेला आणि अनेकजण जखमी झाले.
क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. शेकडोंचे जीव गेले, लहान मुलं गुदमरून गेली. पाहता पाहता मृतांचा आकडा शंभरी पार गेला.
या दुर्घटनेत 340 जणांचा मृत्यू झाला.
मांढरदेवीच्या यात्रेत तेव्हा नेमकं काय घडलं होतं?
1 जानेवारी 2022 – वैष्णोदेवी मंदिर
जम्मू आणि काश्मीरमधील वैष्णो देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 12 लोकांचा मृत्यू झाला. जखनमींचा आकडा यापेक्षाही अधिक होता.
14 जुलै 2015 - राजमुंदरी पुष्करम
आंध्र प्रदेशमधील राजमुंदरीमध्ये पुष्करम उत्सवादरम्यान गोदावरी नदीवर हजारो लोक पोहोचले होते. मात्र घाटावर झालेल्या चेंगराचेंगरीत 27 लोकांचा मृत्यू झाला आणि 20 लोक जखमी झाले.
3 ऑक्टोबर 2014 - पाटणा, गांधी मैदान
पाटण्यातील गांधी मैदानामध्ये दसरा उत्सव साजरा केला जात होता. या ठिकाणी जमलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली आणि 32 लोकांचा मृत्यू झाला. 26 लोकांचा मृत्यू झाला.
13 ऑक्टोबर 2013 - मध्य प्रदेश, रत्नागिरी मंदिर
मध्य प्रदेशमधील दतिया जिल्ह्यातील रत्नागिरी मंदिरात नवरात्राचा उत्सव सुरू होता. त्याचवेळी तिथे जमलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली.
गोंधळामध्ये अनेक जण जमिनीवर कोसळले आणि 115 जणांचा चिरडून मृत्यू झाला. 100 हून अधिक लोक जखमी झाले.
रस्त्यातला एक पूल कोसळला अशी अफवा भाविकांमध्ये पसरला आणि घाबरलेले लोक इकडेतिकडे धावायला लागले होते.
14 जानेवारी 2011 - केरळ, शबरीमला
केरळमधील इदुक्की जिल्ह्यातील पुलमेदूजवळ शबरीमला इथून परतत असलेल्या भाविकांना एका जीपने उडवलं.
त्यानंतर प्रचंड गोंधळ, चेंगराचेंगरी झाली आणि 104 लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 40 हून अधिक लोक जखमी झाले.
4 मार्च 2010 - उत्तर प्रदेश, प्रतापगढ
उत्तर प्रदेशमधील प्रतापगढमध्ये कृपालू महाराज यांच्या रामजानकी मंदिरात अन्न आणि कपड्यांचं दान होत असताना लोक जमले होते. एका स्वयंघोषित तांत्रिकाने या अन्न आणि कपडे वाटप कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
मात्र, कार्यक्रमादरम्यान गर्दीवरचं नियंत्रण सुटलं आणि झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 63 लोकांचा चिरडून मृत्यू झाला.
30 सप्टेंबर 2008 – राजस्थान, चामुंडा देवी मंदिर
राजस्थानमधील जोधपूर शहरातील चामुंडा देवी मंदिरात बॉम्ब ठेवला असल्याची अफवा पसरली आणि तिथे पोहोचलेल्या भाविकांमध्ये गोंधळ उडाला.
या दुर्घटनेत किमान 20 भाविकांचा मृत्यू झाला आणि 60 हून अधिक लोक जखमी झाले.
3 ऑगस्ट 2008 - हिमाचल प्रदेश, नैना देवी मंदिर
हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील नैना देवी मंदिरात डोंगरावरून दगड कोसळण्याची अफवा पसरली आणि लोक घाबरले. यामध्ये 162 लोकांचा मृत्यू झाला आणि 47 लोक जखमी झाले.
याबरोबर 27 ऑगस्टला 2003 ला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील कुंभ मेळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 39 लोकांचा मृत्यू झाला आणि जवळपास 140 लोक जखमी झाले.
 
Published By-Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हाथरस चेंगराचेंगरी : 'सत्संगानंतर लोक भोले बाबांच्या पायाची धूळ घ्यायला गेले आणि गोंधळ उडाला'