दिल्लीत केजरीवाल यांच्यासह आंदोलनाला बसलेले उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांची प्रकृती ढासळली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्वतः केजरीवालांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. सिसोदिया यांच्या रक्तातील किटॉनची पातळी ७.४ पर्यंत पोहोचली आहे. सामान्यतः ही पातळी शून्य असायला हवी. ही पातळी २ पेक्षा जास्त असेल तरीही धोक्याचा इशारा मानला जातो. डॉक्टरांनी नायब राज्यपालांच्या निवासस्थानी जाऊन सिसोदियांची तपासणी केली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापूर्वी रात्रीतून दिल्ली सरकारमधील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृतीही ढासळली होती. सकाळी त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या जैन यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
दरम्यान, आयएएस अधिकाऱ्यांचा अघोषित संप मिटवावा या मागणीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नायब राज्यपालांच्या निवासस्थानातील ठिय्या सोमवारी आठव्या दिवशीही कायम आहे.