केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या विस्तारामध्ये पूर्वीच्या चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेट दर्जा देण्यात आला. तर 9 नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आले. विस्तारामध्ये निर्मला सितारामन यांच्याकडे संरक्षण तर पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला. देशाचे संरक्षण मंत्रीपद सांभाळणाऱ्या इंदिरा गांधी यांच्यानंतर निर्मला सितारामन या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत.
अरुण जेटली यांच्याकडील संरक्षण मंत्रालयाचा भार जरी सितारामन यांच्याकडे सोपवला गेला असला, तरी अर्थमंत्रालय तसेच जेटली यांच्याकडे कायम ठेवण्यात आले आहे. पियुष गोयल यांना रेल्वे मंत्रालयाचा भार सोपवण्यात आला आहे. मात्र त्याचबरोबर त्यांच्याकडे कोळसा मंत्रालयाची जबाबदारीही कायम असणार आहे. त्याशिवाय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि कौसल्य विकास आणि उद्योजकता विकास मंत्रालय या मंत्रालयांची जबाबदारीही त्यांच्याकडेच असणार आहे. दोनच दिवसांपूर्वी राजीव रताप रुडी यांनी या खात्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे गोयल यांच्याकडे या खात्यांची अतिरिक्त जबाबदारी आहे.
रेल्वे मंत्रीपद सोडलेल्या सुरेश प्रभु यांच्याकडे सितारामन यांच्याकडील वाणिज्य मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना त्यांच्याच खात्याचे कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे.
परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अन्य महत्वाच्या खात्यांची जबाबदारी आगोदरपासून होतीच. मात्र आता त्यांच्यावर जलस्रोत मंत्रालयाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उमा भारती यांनी जलस्रोत मंत्रालयाचा राजीनामा दिला आहे. आता त्यांच्याकडे पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आज शपथविधीच्या समारंभाला मात्र उमा भारती अनुपस्थित होत्या.
राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या समारंभामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विरेंद्र कुमार, अनंत कुमार गेहडे आणि गजेंद्र सिंह शेखावत, माजी प्रशासकीय अधिकारी अल्फोन्सो कन्नान्थनाम आणि आर के सिंग, माजी डिप्लोमॅट हरदीप पुरी आणि मुंबईचे माजी पोलिस प्रमुख सत्यपाल सिंग यांना शपथ दिली. यांच्याशिवाय बिहारमधील खासदार अश्विनी कुमार चौबे आणि उत्तर प्रदेशातील शिव प्रताप शुक्ल यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
या नवीन मंत्र्यांपैकी माजी डिप्लोमॅट हरदीप पुरी हे गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाचे राज्य मंत्री (स्वतंत्र कार्यभार) असणार आहेत. तर माजी गृहसचिव आर.के.सिंग हे उर्जा आणि नवीकरणीय उर्जा मंत्रालयाचे आणि के.जे. अल्फोन्सो हे पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) असणार आहेत. त्याशिवाय त्यांच्याकडे “इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान’ खात्याचे राज्यमंत्री पदाचीही जबाबदारी असणार आहे.
विजय गोयल यांच्याकडील क्रीडा मंत्रालय आता राज्यवर्धनसिंह राठोड यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. विजय गोयल हे आता संसदीय कामकाज, कार्मिक आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे राज्य मंत्री असतील.
आज मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट झालेले सर्व नवीन सदस्य हे भाजपचेच सदस्य आहेत. यामध्ये कोणाही सहयोगी पक्षाच्या सदस्यांना समाविष्ट केले गेलेले नाही. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी 6 केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले होते.
आजच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपामध्ये अनेक वर्षांपूर्वी आलेल्या सदस्यांना आणि प्रशासकीय कामाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. पुरी, आर.के. सिंग, सत्यपाल सिंग आणि कन्नानथनम यांच्यासारख्या माजी अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कन्नानथानम आणि पुरी हे सध्या संसद सदस्य नाहीत. त्यामुळे येत्या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांना राज्यसभेमध्ये निवडून यावे लागणार आहे.
मुख्तार अब्बास नक्वी, निर्मला सितारामन, धर्मेंद्र प्रधान आणि पियुष गोयल या राज्यमंत्र्यांना बढती देऊन स्वतंत्र कार्यभाराचा कॅबिनेट दर्जा देण्यात आला आहे. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचेच हे प्रशस्तीपत्रक आहे. डॉ. विरेंद्र कुमार, हेगडे आणि शेखावत हे मध्यप्रदेश, कर्नाटक आणि राजस्थानातून निवडून आले आहेत. या राज्यांमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून तेथील प्रतिनिधींना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.