कोथरुडच्या माजी भाजपा आमदार आणि भाजपाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही भेट झाली. मेधा कुलकर्णी यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना राखीही बांधील. या भेटीसंदर्भात मेधा कुलकर्णी यांनीच ट्विटरवरुन माहिती दिलीय.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. कोरोना काळात वैधव्य आलेल्या महिलांना एक रकमी ५ लाख रुपये अथवा दरमहा ५००० हजार वेतन देण्यात यावे यासाठी आपण राज्य सरकारांना सूचना करावी अशी विनंती मी पंतप्रधानांकडे केली,” असं ट्विट मेधा कुलकर्णी यांनी केलं आहे. अनेक महिलांना करोनामुळे पती गमावावा लागला, त्यामुळे त्यांचा आधार कायमचा गेला आहे. अशा स्थितीमध्ये त्यांच्यावर मुलाबाळांसह संसार चालवण्याची जबाबदारी आली आहे. असं असताना महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी कोणतीही मदत न केल्याबद्दलची नाराजीही मेधा कुलकर्णी यांनी पंतप्रधानांशी बोलताना व्यक्त केली. तसेच अशा गरजू महिलांना मदत करण्यासाठी संजय गांधी निराधार योजनेसारखी योजना तयार करण्याची गरज आहे असं मेधा कुलकर्णी यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिलं.