दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी जमातच्या २५५० परदेशी सदस्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे. या सर्वांवर १० वर्षांसाठी भारतात प्रवेश करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. याआधीदेखील तबलिगी मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांत मार्च महिन्यात सहभागी झालेल्या परदेशी नागरिकांनी व्हिसा शर्तीचे उल्लंघन केल्याने त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे.
एकूण आठ हजार लोक या तबलिगी मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांच्यातील अनेकांमध्ये करोनाची लक्षणे दिसली आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्यांपैकी अनेकजण करोनाबाधित असल्याचे चाचण्यांत स्पष्ट झाले होते. जे लोक पर्यटक व्हिसावर आले होते व तरीही निझामुद्दीन येथील कार्यक्रमास उपस्थित राहिले त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. कारण त्यांनी व्हिसा अटींच्या निर्बंधांचे उल्लंघन केलं होतं.