Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

नरेंद्र मोदींचा राहुल गांधींना टोला, 'वह चल चुके है, वह अब आ रहे है...'

Prime Minister Narendra Modi taunts Rahul Gandhi in speech
, बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (17:04 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातून राहुल गांधींना टोला लगावताना म्हटलं की, "काही व्यक्तींच्या भाषणामधून त्यांची क्षमता कळते. पण अशा व्यक्तिंच्या भाषणानंतर पूर्ण इको सिस्टीम, समर्थक आनंदी झाले. म्हणत होते की, ये हुई ना बात! अशा लोकांसाठी म्हटलं गेलं आहे की, ये कह कह के हम दिल को बहला रहे है; वह चल चुके है, वह अब आ रहे है..."
 
बुधवारी (8 जानेवारी) लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रकट करणारं भाषण केलं.
 
काही खासदारांनी यावेळी वॉकॉऊट केलं तर काँग्रेसच्या खासदारांनी मोदींच्या भाषणावेळी गदारोळ घालण्याचा प्रयत्न केला.
 
लोकसभेत मंगळवारी (7 जानेवारी) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काय नाते आहे हा प्रश्न विचारला.
 
गौतम अदानी हे असं नेमकं काय करतात की ते प्रत्येक व्यवसायात यशस्वी होतात, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.
 
'नरेंद्र मोदींची 'व्हायब्रंट गुजरात'ची जी संकल्पना होती त्याला गौतम अदानींनी सर्व शक्तीनिशी सहकार्य केलं. गौतम अदानी हे नरेंद्र मोदींच्या व्हायब्रंट गुजराचा कणा होते. गौतम अदानी हे आधी जगातील 609 व्या स्थानी होते ते जगातील तिसऱ्या क्रमांकावर कसे पोहोचले,' असं राहुल गांधींनी विचारले.
 
राहुल गांधींच्या या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं, "सभागृहात हास्यविनोद, टीका टिप्पणी होत राहते. पण हे विसरता कामा नये, की एक राष्ट्र म्हणून आपण गौरवाचे क्षण जगत आहोत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातले जे मुद्दे आहेत, ते 140 कोटी भारतीयांनी सेलिब्रेट केले आहेत."
 
"शंभर वर्षांत न पाहिलेली महामारी, विभागलेलं जग, दुसरीकडे युद्धाची स्थिती यामधूनही देश ज्यापद्धतीने सावरला आहे, ते अभिमानास्पद आहे. आव्हानं येत असतात, पण या आव्हानांना पुरून उरलं आहे 140 कोटी भारतीयांचं सामर्थ्य."
 
अनेक देशातील अस्थिरता, आजूबाजूच्या देशात महागाई वाढली आहे, अशावेळी भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. जग भारताकडे आशेनं पाहात आहे. भारताली जी 20 समूहाच्या अध्यक्षतेची संधी मिळाली, ही देशासाठी गौरवाची बाब आहे. पण या गोष्टीचं काही लोकांना वाईट वाटत आहे, असा टोला मोदींनी हाणला आहे.
 
जगातील प्रत्येक विश्वासार्ह संस्था, तज्ज्ञांना भारताकडून आशा आहेत. त्यांना भारताबद्दल विश्वास आहे. यामागे काय कारण आहे? याचं उत्तर भारतात आलेली स्थिरता, नवीन सामर्थ्य आणि इथे निर्माण झालेल्या संधींमध्ये दडलं आहे, असं मोदी म्हणाले आहेत.
 
भारतात स्थिर आणि निर्णयक्षमता असलेलं सरकार आहे. निर्णयाक, पूर्ण बहुमताने चालणारं सरकार आहे, ज्याकडे देशहितासाठी निर्णय घेण्याचं सामर्थ्य आहे. आम्ही आमचा मार्ग सोडणार नाही, देशाला ज्या गोष्टींची गरज आहे, त्या देत राहणार, असं ते पुढे म्हणाले.
 
'काही लोकांना भारताची प्रगती खुपते'
कोरोना काळात मेड इन इंडिया लस बनवली गेली. देशाने जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम राबवली. देशातील नागरिकांचं मोफत लसीकरण केलंच, पण त्याचबरोबर इतर देशांनाही लस पुरवली. याच काळात डिजिटल इन्फ्रास्टक्चर वाढलं, असं मोदी म्हणाले
डिजिटल इंडियाबद्दल जगभरात कौतुक होत आहे.
 
भारतात नवीन शक्यता आहेत. संपूर्ण जग कोरोना काळात पुरवठ्याच्या मुद्द्यावर चिंतित झालं होतं, पण भारत त्यादिशेने वाटचाल करत आहे. जगातील मॅन्युफ्रॅक्चर हब म्हणून भारत विकसित होत आहे. जग भारताच्या प्रगतीत आपली प्रगती पाहात आहे. पण काही लोकांना भारताची ही प्रगतीही खुपत आहे, असा आरोप त्यांनी केला.
 
या निराशेमागे मनात जो विचार आहे, तो सुखाने झोपू देत नाहीये. 2014 च्या आधी, 2004 ते 2014 या दहा वर्षांत भारताची अर्थव्यवस्था गाळात रुतली होती, महागाईचा दर दोन अंकी होता. अशावेळी आता होणारी प्रगती पाहून निराशा येणारच ना, असा टोला मोदींनी काँग्रेसला हाणलाय.
 
काँग्रेसवर आरोप
2004 ते 2014 स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील सर्वाधिक घोटाळ्याचा काळ राहिला होता. प्रत्येक नागरिक असुरक्षित होता. दहा वर्षांत जम्मू-काश्मीरपासून ईशान्य भारतापर्यंत सगळीकडे हिंसाचार झाला होता. जागतिक व्यासपीठावर भारताचा आवाज इतका क्षीण होता की, जग तो ऐकायलाही तयार नव्हतं, असा दावा मोदींनी केला आहे.
 
पण आज जेव्हा देशाचं सामर्थ्य जगाला दिसत आहे, ते त्यांच्या निराशेचं कारण आहे.
यूपीएची ओळख ही केवळ संधीचं रुपांतर संकटात करणारे एवढीच मर्यादित राहिली. जग तंत्रज्ञानाची भाषा करत असताना, ते 2 जी घोटाळ्यात अडकले, आण्विक करार झाला, तेव्हा ते 'कॅश फॉर व्होट'मध्ये अडकले, असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला.2004 ते 14 हा काळ देशाच्या इतिहासात The lost decade म्हणून ओळखला जाईल, असं मोदी म्हणालेत.
 
राहुल गांधींची उडवली खिल्ली
ईडीने सगळ्या विरोधकांना एका मंचावर आणलं आहे. त्यांनी ईडीचे आभार मानायला हवेत, असं मोदी म्हणाले.
 
इथे काही लोकांना हॉर्वर्डमधील अभ्यासाचं फार कौतुक आहे. काँग्रेसने कोरोना काळातही म्हटलं होतं की, भारतातील विध्वंसाची केस स्टडी हॉर्वर्डमध्ये अभ्यासली जाईल. कालही असाच एक उल्लेख झाला. पण गेल्या काही वर्षांत हॉर्वर्डमध्ये एक अभ्यास झाला- काँग्रेसचा ऱ्हास. भविष्यात केवळ हॉर्वर्डच नाही, तर इतर विद्यापीठांमध्येही काँग्रेसच्या ऱ्हासाचा अभ्यास होईल, असं म्हणत मोदींनी राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे.
 
विरोधकांनी अदानींच्या मुद्द्यावरून केलेल्या आरोपावर बोलताना नरेंद्र मोदींनी म्हटलं, "देशवासियांचा मोदींवर जो विश्वास आहे, तो या लोकांच्या समजून घेण्याच्या क्षमतेपलिकडचा आहे. ज्या व्यक्तीला वन नेशन, वन रेशनमुळे धान्य मिळतं, तो तुमच्या घाणेरड्या आरोपांवर कसा विश्वास ठेवेल? ज्या शेतकऱ्याच्या खात्यात पीएम किसान योजनेअंतर्गत पैसे येतात, तो तुमच्या या खोट्या आरोपांवर का विश्वास ठेवेल? 9 कोटी लोकांना मोफत गॅस कनेक्शन मिळालं आहे, तो तुमचा खोटेपणा का स्वीकारेल? लोकांच्या संकटकाळी मोदी मदतीला आले आहेत. ते लोक तुमच्या शिव्याशापांवर का विश्वास ठेवतील?"
 
काही लोक स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी जगत आहेत. मोदी मात्र 25 कोटी भारतीयांच्या कुटुंबासाठी जगत आहेत. 140 कोटी लोकांचे आशीर्वाद माझं सुरक्षा कवच, तुमचे शिव्याशाप ते भेदू शकत नाहीत, असा मोदींनी काँग्रेसला उद्देशून म्हटलं आहे.

Published By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विमानात खिडकीत बसण्यावरून प्रवाशांमध्ये हाणामारी