Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नीट परीक्षेतील गैरप्रकार पाहात तामिळनाडूच्या धर्तीवर परिक्षेबाबत निर्णय घ्या

नीट परीक्षेतील गैरप्रकार पाहात तामिळनाडूच्या धर्तीवर परिक्षेबाबत निर्णय घ्या
, मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (22:28 IST)
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने तामिळनाडूच्या धर्तीवर नीट परिक्षेबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेचे आयोजन केले जाते. 
 
परंतु या परिक्षेत दिवसेंदिवस वाढणारे गैरप्रकार पाहता नीट परीक्षा व्यापम घोटाळ्याचा पुढचा अंक आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पेपर फोडून, डमी विद्यार्थी बसवून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरु असून गरीब, मध्यमवर्गीय मुला-मुलींनी डॉक्टर होऊ नये म्हणून नीटचा वापर सुरु आहे का? असा सवालही पटोले यांनी पत्रकार परिषदेत केला.
 
देशभरातून १६ लाख विद्यार्थी नीटची परीक्षा देतात. पण त्यातील गैरव्यवहार वाढले आहेत. प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकारही वाढीस लागल्याच्या घटना नागपूर, जयपूर सारख्या ठिकाणी घडल्या आहेत. त्यातच नीटमध्ये सीबीएससी आणि इतर केंद्रीय मंडळाच्या विद्यार्थ्यांची संख्या ही राज्य परीक्षा मंडळाच्या विद्यार्थ्यांपेक्षा वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही बोर्डाच्या अभ्यासक्रमातील तफावत हा जसा त्यातील मुद्दा आहे तसेच नीटसाठी कोचिंग क्लासेसची असलेली भरमसाठ फी ही गरिब, सामान्य कुटुंब, ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना परवडणारी नाही, असे पटोले म्हणाले.
 
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची राज्यनिहाय आकडेवारी पाहता नीट परिक्षेनंतर राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांची मेडीकलमधील संख्या कमी कमी होत असून सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत जाताना दिसत आहे.हे अन्याय आणि असमानता वाढवणारे आहे. यामुळे ग्रामीण भागातले तसेच सामान्य कुटुंबातील विद्यार्थांचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न धुळीस मिळत आहे. या सर्वांचा विचार करून महाराष्ट्र सरकारने नीट परीक्षा रद्द करावी. राज्य मंडळाच्या परीक्षा गुणांवर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्याविरोधात दुसऱ्या घोटाळ्याचे पुरावे ईडी कार्यालयात सादर