व्हिंटेज म्हणजेच जुन्या, नामशेष झालेल्या मॉडेल वाहनांना जतन करण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी,अशा व्हिंटेज मोटार वाहनांची वेगळी नोंदणी प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे,अशी माहिती, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.सध्या अशा वाहनांची नोंदणी करण्यासाठी कोणत्याच राज्यात निश्चित नियम अथवा नोंदणीची प्रकिया अस्तित्वात नाही.
नवीन नियम,एक सुलभ प्रक्रिया उपलब्ध करतील. या प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे,आधीच नोंदणीकृत असलेल्या वाहनांचा तोच जुना क्रमांक नव्या नोंदणीत कायम ठेवता येणार असून,नव्याने नोंदणी होणाऱ्या वाहनांसाठी “VA” अशी नवी मालिका ( विशिष्ट नोंदणी चिन्ह) दिला जाणार आहे.
रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने CMVR 1989 मध्ये दुरुस्ती करत,व्हिंटेज मोटार वाहन नोंदणी प्रक्रिया निश्चित केली आहे.जुन्या, व्हिंटेज वाहनांचे जतन करण्याच्या परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी ही नोंदणी प्रक्रिया सुनिश्चित करण्यात आली आहे.
ठळक वैशिष्ट्ये
– सर्व दुचाकी/चारचाकी वाहने, जी 50 पेक्षा अधिक वर्षे जुनी असतील, आणि ती त्यांच्या मूळ रुपात सांभाळली गेली असतील,ज्यांच्यात कोणतीही मोठी दुरुस्ती करण्यात आली नसेल,अशा सर्व वाहनांना व्हिंटेज मोटार वाहन म्हटले जाईल.
– नोंदणी/पुनर्नोंदणी करण्यासाठीचे अर्ज फॉर्म 20 नुसार करता येतील.त्यासोबत, विमा पॉलिसी,शुल्क,वाहन परदेशी असल्यास,आणल्याची शुल्क पावती आणि आधी नोंदणी झालेल्या वाहनांचे जुने नोंदणी प्रमाणपत्र जोडावे लागेल.
– राज्य नोंदणी प्राधिकरण फॉर्म क्रमांक 23A नुसार, 60 दिवसांच्या आत नोदणी प्रमाणपत्र प्रदान करेल.
– ज्या वाहनांची आधीच नोंदणी झाली, त्यांना आपले आधीची नोंदणी चिन्हे कायम ठेवता येतील. मात्र, नव्याने नोंदणी करण्यासाठी नोंदणी “XX VA YY*”अशा प्रकारे केली जाईल.ज्यात VA चा अर्थ व्हिंटेज, XX च्या स्थानी राज्याचा कोड आणि YY च्या स्थानी दोन अंकी वाहन मालिका आणि * हा क्रमांक 0001 ते 9999 यापैकी, राज्य प्राधिकरणाकडून मिळालेला क्रमांक असेल.
– नव्या नोंदणीसाठीचे शुल्क 20,000 आणि पुनर्नोंदणीचे शुल्क 5,000 रुपये असेल.
– व्हिंटेज मोटर्स नियमित/व्यावसायिक स्वरूपात रस्त्यांवर चालवता येणार नाहीत.