विरोधकांकडे अजेंडाच नसून विरोधकांनी सर्वप्रथम एक अजेंडा ठरवला पाहिजे. काँग्रेस हा मोठा पक्ष असल्याने अजेंडा ठरवण्याची जबाबदारीच त्यांची आहे असे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मांडले आहे. याशिवाय मी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत २०१९ ची लोकसभा निवडणूक, विरोधकाची एकजूट आदी विषयांवर भाष्य केले.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहात का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर नितीशकुमार म्हणाले,मी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत नाही. या पदावर विराजमान होण्याची माझी पात्रतादेखील नाही. आमचा पक्ष छोटा असून आम्ही अतिमहत्त्वाकांक्षा ठेवणे अयोग्य आहे असेही त्यांनी नमूद केले. विरोधकांकडे सध्या अजेंडाच नाही. पण त्यांनी सर्वप्रथम एक अजेंडा ठरवायला हवा असे मत नितीशकुमारांनी मांडले. विरोधकांमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांनीच अजेंडा ठरवणे गरजेचे आहे. त्यांनी मतदारांना एक सक्षम पर्याय दिला पाहिजे असे त्यांनी सांगितले.