कोरोनाच्या कहरानंतर देशातील अनेक भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत आहे. हे सर्व पाहता डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने पूर्ण तयारी केली आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपायांसह तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी तज्ज्ञांची केंद्रीय पथके नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाठवली. हरियाणा, पंजाब, केरळ, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
तज्ञ संघांमध्ये राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि मच्छर-जनित रोग नियंत्रण कार्यक्रमाचे अधिकारी समाविष्ट आहेत. हे पत्र आरोग्य सेवा महासंचालक आणि नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना (आरोग्य) पाठवण्यात आले आहे.
डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपायांसह तांत्रिक मार्गदर्शन देऊन राज्य सरकारांना मदत करण्यासाठी केंद्रीय पथके तैनात करण्याचा निर्णय सक्षम प्राधिकरणाने घेतला आहे, असे त्यात म्हटले आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी केंद्रीय आरोग्य सचिवांना डेंग्यूची जास्त प्रकरणे असलेल्या राज्यांची ओळख पटवून तज्ज्ञांचे पथक पाठवण्याचे निर्देश दिले.
आरोग्यमंत्र्यांनी या आजारावर नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी दिल्लीतील डेंग्यू परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीत यावर्षी डेंग्यूचे 1,530 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ऑक्टोबरमध्ये सुमारे 1,200 प्रकरणे नोंदवली गेली, जी गेल्या चार वर्षांतील या महिन्यात सर्वाधिक प्रकरणे आहेत.