Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंधश्रद्धेपोटी घुबडांचा व्यापार तेजीत

अंधश्रद्धेपोटी घुबडांचा व्यापार तेजीत
तब्बल २० हजार वन्य पक्ष्यांचा व्यापार भारतात दरवर्षी सुमारे वीसच्या आसपास असणाऱ्या पक्षी बाजारात होत असल्याचे ट्रॅफिक इंडिया आणि 'डब्ल्यूडब्ल्यूएफ' या वन्यजीवांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या सर्वेक्षणात समोर आले आहे.
 
यात घुबडांचा दिवाळीच्या सुमारास होणारा व्यापार आघाडीवर आहे. पक्ष्यांच्या व्यापारात दिल्ली आणि चंदीगड ही दोन शहरे आघाडीवर असल्याचेही यात म्हटले आहे.
भारतीय वन्यजीव कायद्यांतर्गत जंगलात आढळणाऱ्या सुमारे ३२ पक्ष्यांच्या प्रजाती संरक्षित आहेत, पण त्या कुठेही, कोणत्याही किमतीवर सहजपणे मिळतात. घुबडाला जंगली पक्ष्यांमध्ये सर्वाधिक मागणी आहे. कारण, आर्थिक समृद्धी आणि अंधश्रद्धा या दोन गोष्टी त्यासाठी कारणीभूत मानल्या जातात. याच कारणामुळे घुबडांच्या दोन प्रजाती नामशेषाच्या यादीत आहेत. अंधश्रद्धेपोटी होणारा त्यांचा अवैध व्यापार आणि विकासात्मक प्रकल्पांकरिता त्यांच्या अधिवासांवर होणारे अतिक्रमणही त्यांच्या नामशेषाकरिता कारणीभूत आहेत.
 
इतर पक्ष्यांच्या तुलनेत वर्षभरात त्यांना फारशी मागणी नसली तरीही दिवाळीत त्यांची मागणी आणि व्यापार वर्षभराची कसर काढून टाकतात. त्यामुळेच भारतीय जंगलातील घुबडांच्या प्रजातींवर गंडांतर आले आहे. काही पारधी जमातींचा शिकार हा व्यवसाय असल्याने तेही या व्यापारात गुंतले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. स्पॉटेड आऊलेट या प्रजातीचा मुख्य बाजार लखनऊ येथे आहे. तसेच जुन्या दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कबुतर मार्केट या नावाने पक्ष्यांचा प्रसिद्ध बाजार आहे. दिल्लीतील या बाजारात कबुतरांव्यतिरिक्त इतर विदेशी पक्षीसुद्धा ठेवलेले असतात. 
 
भारतीय वन्यजीव गुन्हे शाखेच्या वतीने पोलिसांच्या सहकार्याने दिवाळीच्या दिवसात पक्ष्यांच्या बाजारात गस्त केली जाते. मात्र, घुबडासह व्यापाऱ्यांना पकडणे त्यांनाही कठीण जाते. लहान घुबडांची किमत साधारपणे ८ हजार रुपये आणि मोठय़ा घुबडांची किंमत २० हजार रुपये आहे. दिवाळीत यात आणखी वाढ होते. अनेकजण दिवाळीच्या काही दिवस आधीच सौदा करून ठेवतात आणि दिल्लीच्या बाहेर जाऊन त्यांच्या हा देवाणघेवाणीचा व्यवहार पूर्ण होतो. मात्र, राष्ट्रीय वन्यजीव गुन्हे शाखेच्या नोंदीत एकाही घुबड व्यापाऱ्याचे नाव नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घड्याळ फिरते उलट दिशेने