जम्मू-काश्मीरमध्ये जमावानं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची बेदम मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. मोहम्मद आयुब पंडित असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. ते नौहट्टा परिसरातील मशिदीबाहेर सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात होते.
काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना आणि दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. रमजानमधील नमाज पठण असल्यानं खबरदारी म्हणून ठिकठिकाणच्या मशिदींबाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. काश्मीरमध्ये सर्व मुस्लिम बांधव शब-ए-कद्रचा उत्सव साजरा करत आहेत. त्यासाठी सर्व लोक रात्रभर जागून मशिदी आणि दर्ग्यांमध्ये नमाजासाठी येतात. नौहट्टामधील मशिदीबाहेरही पोलिसांचा बंदोबस्त होता. पोलीस उपअधीक्षक मोहम्मद अयुब पंडितही तैनात होते. ते मशिदीचा फोटो काढत असल्याचा जमावाचा गैरसमज झाला. काही वेळ गोंधळ उडाला. पोलीस अधिकाऱ्यानं हवेत गोळीबार केला. त्यात ३ लोक जखमी झाले. त्यानंतर जमावाने पोलीस उपअधीक्षक पंडित यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना बेदम मारहाण केली. तसंच दगडाने ठेचून त्यांची हत्या केली.