Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पन्नीरसेल्वम यांची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी

पन्नीरसेल्वम यांची अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी
चेन्नई , बुधवार, 15 फेब्रुवारी 2017 (11:49 IST)
शशिकला यांना बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी दोषी ठरवल्यानंतरही एआयएडीएमकेमधील संघर्ष शमलेला नाही. ओ. पन्नीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.   
 
मंगळवारी एकीकडे न्यायालय निर्णय देत असताना दुसरीकडे अण्णा द्रमुकच्या महासचिव शशिकला चेन्नईतील आलिशान रिसॉर्टमध्ये पक्षाच्या आमदारांची बैठक घेत होत्या. या बैठकीत त्यांनी पक्षाच्या आगामी वाटचालीची दिशा ठरवली. निकाल विरोधात लागताच शशिकला यांनी सर्वप्रथम बंडखोरीचा झेंडा फडकवणारे काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी केली. पन्नीरसेल्वम यांना पाठिंबा देणारे १२ खासदार आणि ८ आमदारांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तसेच अण्णा द्रमुकवरील आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शशिकला यांनी विश्‍वासू पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. पलानीस्वामी यांनीही संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र देत सत्तेसाठी दावा केला. सूत्रांच्या माहितीनुसार, शशिकला त्यांचा पुतण्या दीपक जयकुमार याला विधिमंडळ पक्षाचा नेता निवडणार होत्या. मात्र यामुळे पन्नीरसेल्वम गटाला घराणेशाहीचा आरोप करून प्रतिमा मलीन करण्याची आयती संधी मिळणार असल्याने दीपकची निवड टाळण्यात आली.
 
दुसरीकडे शशिकलांच्या शिक्षेमुळे मार्गातील अडथळा दूर झालेले पन्नीरसेल्वम सुखावले आहेत. मंगळवारी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर जमलेल्या सर्मथकांशी बोलताना त्यांनी मतभेद विसरून पक्ष फोडण्यासाठी सरसावलेल्या विरोधकांच्या विरोधात एक होण्याचे आवाहन केले. अम्मांचा आत्मा आपल्यासोबत असून, तो आपल्याला मार्गदर्शन करत राहील. अम्मांचे सुशासन आणि लोककल्याणाचे काम आपण यापुढेही करत राहू. कोणाच्याही पाठिंब्याशिवाय आपण सरकार स्थापन करू, असे पन्नीरसेल्वम म्हणाले. न्यायालयाच्या निर्णयानंतर पन्नीरसेल्वम यांच्या सर्मथनार्थ अधिकाधिक आमदार पुढे येत आहेत.
 
मंत्र्यांनी कामकाज सुरू करावे असे आवाहन त्यांनी केले. तर दुसरीकडे पक्षाच्या आमदारांनी शशिकला यांच्या जागी ई.के. पलनीस्वामी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशात आयआयटी शिक्षकांची ३५ टक्के पदे रिक्त!