PM Modi Nepal Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi In Nepal)सोमवारी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने नेपाळ भेटीवर लुंबिनी येथे पोहोचले. यावेळी त्यांनी बौद्ध परिषदेला संबोधित केले. या भाषणादरम्यान पंतप्रधानांनी भगवान बुद्धांच्या माध्यमातून भारत आणि नेपाळमधील संबंधांचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले.
भारत-नेपाळ संबंधांवर चर्चा करताना ते म्हणाले की, या दोन देशांमधील संबंध हिमालयाएवढे जुने आहेत आणि दोन्ही देशांमधील वाढत्या जवळीकीचा संपूर्ण मानवतेला फायदा होईल. ते म्हणाले की, भारतातील सारनाथ, बोधगया आणि कुशीनगर ते नेपाळमधील लुंबिनीपर्यंत हा समान वारसा समान मूल्यांचे प्रतीक आहे. त्याचा एकत्रित विकास करण्याची जबाबदारी आपल्या दोघांची आहे. जेणेकरुन पुढे त्याची भरभराट होईल.
नेपाळ म्हणजे जगातील सर्वात उंच पर्वत सागरमाथा चा देश
नेपाळमधील लुंबिनी संग्रहालयाचे बांधकाम हे दोन्ही देशांच्या संयुक्त सहकार्याचे उदाहरण असल्याचे पंतप्रधानांनी बौद्ध परिषदेत सांगितले आणि आज आम्ही लुंबिनी बौद्ध विद्यापीठात डॉ. आंबेडकर चेअर ऑफ बुद्धिस्ट स्टडीज स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान म्हणाले की नेपाळ म्हणजे जगातील सर्वात उंच पर्वत सागरमाथाचा देश. नेपाळ हा जगातील अनेक पवित्र तीर्थक्षेत्रे, मंदिरे आणि मठांचा देश आहे. ते पुढे म्हणाले, नेपाळ हा जगातील प्राचीन सभ्यता आणि संस्कृतीचे जतन करणारा देश आहे.
नेपाळशिवाय आपला रामही अपूर्ण आहे.
पंतप्रधान म्हणाले की, नेपाळशिवाय आपला रामही अपूर्ण आहे. अयोध्या राम मंदिरामुळे नेपाळचे लोकही खूश आहेत.
2014 सालापासून पंतप्रधान मोदींचा हा पाचवा नेपाळ दौरा आहे आणि सीमावादामुळे संबंधांवर परिणाम झाल्यानंतर 2020 मधील पहिला नेपाळ दौरा आहे. आज लुंबानी येथे पोहोचल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांनी पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत केले. पंतप्रधान मोदींनी लुंबिनी येथील महामाया देवी मंदिरात जाऊन पूजाही केली. यावेळी त्यांच्यासोबत नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या नेपाळ दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये अनेक करारांवर बोलणी झाली.