Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘मन की बात’मध्ये मोदींनी कौतुक केलेला, साताऱ्याचा प्रविण जाधव आहे तरी कोण?

‘मन की बात’मध्ये मोदींनी कौतुक केलेला, साताऱ्याचा प्रविण जाधव आहे तरी कोण?
, सोमवार, 28 जून 2021 (07:53 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, एकाच दिवसात 86 लाखांहून अधिक लोकांना लसीची मात्रा देत भारताने अभूतपूर्व कामगिरी केली. आकाशवाणीवरील आपल्या मन की बात कार्यक्रमातून देशाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, लसीकरण मोहिमेचा पुढील टप्पा सुरू झाल्यानंतर 21 जून रोजी देशाने ही अभूतपूर्व कामगिरी साध्य केली. पंतप्रधान म्हणाले की, हा सर्वत्र चर्चेचा विषय आहे कारण एकाच दिवसात सरकारकडून इतक्या मोठ्या प्रमाणात विनामूल्य लसीकरण करण्यात आले होते.
प्रत्येक नागरिकाला लसीद्वारे प्रदान करण्यात आलेल्या सुरक्षिततेचा लाभ घेता यावा हे सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, यावर श्री. मोदी यांनी भर दिला. कोविडवर विजय मिळविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे लागेल असे  सांगत कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल असे ते म्हणाले.
मोदी म्हणाले, देशातील प्रत्येक व्यक्तीने मग ते बँक कर्मचारी, शिक्षक, छोटे व्यापारी किंवा दुकानदार, फेरीवाले,सुरक्षा कर्मचारी किंवा टपालवाहक असोत या सगळ्यांनी  महामारीच्या  विरोधात लढा दिला आहे.
पंतप्रधानांनी भारत सरकारचे सचिव असलेले गुरुप्रसाद महापात्रा  यांचे स्मरण केले.  मोदी म्हणाले की, देशातील ऑक्सिजन उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी आणि दुर्गम भागात ऑक्सिजन पोहोचवणे सुनिश्चित करण्यासाठी  त्यांनी दिवसरात्र परिश्रम घेतले. कोरोनामुळे हा कर्मयोगी देशाने गमावला याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले.
प्रवीण जाधव जे कठीण संघर्षानंतर ऑलिंपिकमध्ये पोहोचले आहेत त्यांचा देखील पंतप्रधानांनी उल्लेख केला. प्रवीण जाधव महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका गावात राहतात. ते तिरंदाजीतील  उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांचे आईवडील मजुरी करून कुटुंब चालवतात आणि आता त्यांचा मुलगा, आपल्या पहिल्या ऑलिंपिकसाठी टोकियोला जात आहे. ही फक्त त्यांच्या आई वडिलांसाठीच नव्हे, तर आपल्या सर्वांसाठीही अभिमानाची गोष्ट आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
या खेळाडूंवर जाणूनबुजून किंवा नकळत दबाव आणू नका, तर त्यांना खुल्या  मनाने साथ द्या आणि त्यांचा उत्साह वाढवा, असा सल्ला मोदी यांनी जनतेला दिला. या खेळाडूंसाठी  #Cheer4India याहॅशटॅग सह  समाजमाध्यमांवर शुभेच्छा पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान म्हणाले की, ते जलसंधारणाला देशाची सेवा करण्याचा एक प्रकार मानतात. उत्तराखंडमधील पौरी गढवाल येथील सच्चिदानंद भारती यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
मोदी म्हणाले, देशात 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. देशातील थोर डॉक्टर बी. सी.  राय यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. कोरोना कालावधीत डॉक्टरांच्या योगदानाबद्दल श्री. मोदी यांनी  कृतज्ञता व्यक्त केली.
पंतप्रधान म्हणाले, चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे सनदी लेखापाल दिवसही 1 जुलै रोजी  साजरा केला जातो. त्यांनी सर्व सनदी लेखापाल आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 15 ऑगस्टही जवळ येत आहे आणि स्वातंत्र्याच्या  75 वर्षांचा अमृत महोत्सव ही एक मोठी प्रेरणा आहे.
ते म्हणाले, लोकांचा मंत्र – भारत प्रथम (India First) हा असावा आणि प्रत्येक निर्णयाला भारत प्रथम (India First) चा आधार असावा.
कोविडमुळे निधन झालेले दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांच्याबद्दलही पंतप्रधान बोलले. ते म्हणाले की, त्यांनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या  खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी मिल्खा सिंग यांना आवाहन केले होते, पण दुर्दैवाने नियतीला हे मान्य नव्हते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ड्रॅगनफ्रूट सांगली ते थेट दुबई; महाराष्ट्रातून प्रथमच निर्यात