लोकशाहीच्या मंदिरात अर्थात संसदेत माझ्या विचारांना पैलू पडले, मी या संसदेची निर्मिती आहे असं म्हटलं तर चुकीचं वाटायला नको, २२ जुलै १९६९ हा माझा संसदेतला पहिला दिवस होता. निरोपाचं भाषण करताना मला संसदेतला पहिला दिवस आठवतो आहे, राष्ट्रपती म्हणून मी आता या सभागृहाचा निरोप घेतो आहे हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणिय आहे असे सांगत मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रविवारी संसदेचा निरोप घेतला.
या सभागृहाशी असलेली माझी बांधिलकी याहीपुढे कायम राहिल, १९६९ पासून आजवर या सभागृहात मी अनेक घडामोडी पाहिल्या आहेत. विरोधी बाकांवरच्या खासदारांची भूमिकाही मी पाहिली आहे आणि सत्ताधारी पक्षांचीही भूमिका पाहिली आहे. संसदेतले गदारोळही पाहिले आहेत आणि एखाद्या घटनेवर किंवा विधेयकावर होणारी एकवाक्यताही पाहिली आहे. मी गेल्या ३७ वर्षांमध्ये अनेक बदल पाहिले आहेत. आता हे सभागृह सोडताना हे सगळं काही माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं आहे असंही प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे.