उत्तर प्रदेशातील 403 जागांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालंय. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येणार आहे, तर दुसरीकडे केंद्राच्या राजकारणात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून भूमिका बजावणाऱ्या काँग्रेसच्या फक्त 2 जागा आल्या आहेत.
2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकूण 7 जागा मिळाल्या होत्या आणि पक्षाची मतांची टक्केवारी 6.25 टक्के इतकी होती. यावेळी मात्र निवडणुकीत त्यांची मतांची टक्केवारी घसरून 2.34 टक्क्यांवर आलीय.
निकाल आल्यानंतर प्रियंका गांधींनी ट्वीट करुन मान्य केलंय की पक्षाला आपल्या मेहनतीचं मतांमध्ये रूपांतर करण्यात यश आलं नाही.
त्या म्हणतात की, "लोकांचं मत लोकशाहीत सर्वस्वी आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी खूप कष्ट घेतले, पक्ष संघटन मजबूत केलं, जनतेच्या प्रश्नांवर लढा दिला. पण, आमच्या मेहनतीचे रूपांतर मतांमध्ये करण्यात आम्हाला यश आलं नाही."
मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी प्रियंका गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधून "निराश होऊ नका," असं सांगितलं. आपला लढा नुकताच सुरू झाला असून आपल्याला नव्या ऊर्जेने पुढं जायचं आहे, असं ही त्या म्हणाल्या.
दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट केलंय की, "मी नम्रतेने निकाल स्वीकारतो. ज्यांना जनादेश मिळाला त्यांचे अभिनंदन करतो. मी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांच्या मेहनतीबद्दल आभार मानतो. यातून आम्ही धडा घेऊ. लोकांच्या हितासाठी कायम काम करत राहू."
अशा स्थितीत काँग्रेसला ही निवडणूक जिंकणं अवघड असेल, याची कल्पना होती का? पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात पक्षाची धुरा मजबुत पद्धतीनं सांभाळली तसंच रोड शो आणि रॅलींद्वारे प्रचंड गर्दी जमवली, मात्र तरीसुध्दा त्याचं मतांमध्ये रूपांतर करण्यात त्या अपयशी ठरल्या.
प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'लडकी हूं लड़ सकती हूं' चा नारा दिला आणि लखनऊमध्ये 'महिला जाहीरनामा' प्रसिद्ध केला आणि आपल्या पक्षाचं सर्वाधिक प्राधान्य महिलांना असेल असं सांगितलं.
त्याचवेळी त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी अनेक आश्वासनं दिली, ज्यामध्ये 40 टक्के जागांवर महिलांना उमेदवारी देणार हे प्रमुख होतं.
त्यांनी आपलं आश्वासन पूर्णसुध्दा केलं, काँग्रेस पक्षानं पहिल्याच यादीत 50 महिलांना उमेदवार म्हणून निवडलं. त्यामध्ये अनेक अशा महिला उमेदवार होत्या ज्यांनी यापूर्वी कधीही निवडणूक लढवली नव्हती.
1. नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
ज्येष्ठ पत्रकार रामदत्त त्रिपाठी म्हणतात, "प्रियंका गांधींनी 40 टक्के तिकीटं महिलांना देण्याची घोषणा हा केवळ एक प्रसिद्धी स्टंट होता. त्याला ना राजकीय आधार होता ना सामाजिक आधार होता."
हा मुद्दा पुढे नेत ज्येष्ठ पत्रकार अमिता वर्मा म्हणतात की, "त्यामुळे प्रियंका गांधींच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण होतात. त्यांनी आपलं लक्ष निवडणूक प्रचारावर केंद्रित केलं, पण काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. तसंच त्यांची ही मोहीम राजकीय पेक्षा जास्त सामाजिक वाटत होती."
त्या म्हणतात, "राज्यातील जितिन प्रसाद, आरपीएन सिंग आणि ललितेशपती त्रिपाठी यांसारखे काँग्रेसचे चेहरे त्यांच्यावर रागावले होते. त्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलं, राहुल गांधींकडे गेले आणि त्यांनी प्रियंका गांधींशी बोला, असं सांगितलं, पण त्या भेटल्याच नाहीत. अनेक लोक पक्ष सोडून गेले, काहींना काढून टाकण्यात आलं, पण संघटना कमकुवत होत आहे याकडं त्यांनी लक्ष दिलं नाही.
त्याचबरोबर ज्या महिलांना तिकीट देण्यात आलं, यामध्ये कोणतेच चांगले उमेदवार नव्हते, बलात्कार पीडितेच्या आईला तिकीट देऊन लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुध्दा करण्यात आला होता."
त्यांच्या मते, "काँग्रेस आपल्या अमेठी आणि रायबरेलीसारख्या पारंपरिक जागांवरही विजय मिळवू शकत नाही, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावरही प्रश्न निर्माण होतो."
2. काँग्रेसकडे गमावण्यासारखं काय आहे?
बिझनेस स्टँडर्डमधील राजकीय पत्रकार सिद्धार्थ कलहंस म्हणतात की, "काँग्रेसला माहीत होतं की त्यांच्याकडे कमावण्यासारखं आणि गमावण्यासारखं काही नाही आणि ही निवडणूक त्यांच्यासाठी एक प्रयोग होती, कारण गेल्या वेळी लढलेल्या उमेदवारांनी पक्ष सोडला आहे."
2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सपासोबत निवडणूक लढवली आणि काँग्रेसला सात जागा मिळाल्या होत्या.
सिद्धार्थ कलहंस यांच्या म्हणण्यानुसार, "यावेळी पक्षाने तळागाळातल्या तरुण कार्यकर्त्यांना तिकीटं दिली. या निवडणुकीत काँग्रेसने उल्लेखनीय कामगिरी केली नसली, तरी 2017 मध्ये ज्या 300 जागांवर पक्ष आपल्या चिन्हावर लढला नव्हता. तिथं प्रियंका गांधी या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या मतदारांपर्यंत पोहोचू शकल्या आहेत."
त्यांच्या म्हणण्यानुसार, "त्यांनी निवडणूक लढवली असती तर फारसा परिणाम झाला असता, अशीही चर्चा होती, पण त्या काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक होत्या आणि गर्दी वाढवण्यात किंवा गर्दी जमवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. अशात परिस्थितीतही त्यांनी निवडणूक लढवली असती तर संपूर्ण राज्याला वेळ देता आला नसता."
3. कमकुवत पक्ष संघटना
रामदत्त त्रिपाठी आणि अमिता वर्मा या दोघांचही मत आहे की, अखिलेश यादव आणि प्रियंका गांधी यांच्या रोड शोमध्ये गर्दी जमली होती, पण दोन्ही पक्षांनी त्यांच्या पक्ष संघटनेकडे लक्ष दिलं नाही.
काँग्रेसने कोणत्याही प्रादेशिक नेत्याला उभं केलं नाही किंवा कोणाला संघटनेचा किंवा समाजाचा नेता बनवलं नाही. प्रियंका गांधींचे हातरसचं प्रकरण किंवा लखीमपूर खिरीतील शेतकऱ्यांचा मुद्दा त्यांनी अतिशय खंबीरपणे मांडला, पण त्याचाही काही परिणाम या निवडणूकीत झाला नाही, कारण सर्वसामान्य लोकांचा असा समज झाला की या दिल्लीहून आल्या आहेत आणि निवडणुक संपली की पुन्हा परत जातील.
सिद्धार्थ कलहंस यांनी उत्तर प्रदेशातील या निवडणुकीचे वर्णन 'द्विध्रुवीय' असं केलं आहे. ते म्हणतात, "मुख्य लढत भाजप आणि सपा यांच्यात होती. अशा स्थितीत या दोन मोठ्या पक्षांचं मताधिक्य वाढणं निश्चितच होतं, काँग्रेसची मतं निश्चितच कमी झाली आहेत, पण प्रियंका गांधी यांच्या प्रयत्नांचे कौतुक करायला हवं ."प्रियंका गांधी गेल्या काही वर्षांत राजकारणात फारशा सक्रिय नव्हत्या, पण ज्या पद्धतीने त्या यूपीमध्ये दिसल्या, त्यावरून काही तज्ज्ञांचं असं मत होतं की, या निवडणुकांमध्ये पक्ष कोणताही चमत्कार करू शकणार नाही, अशी काँग्रेसला कल्पना होती, परंतु ही तयारी 2024 ची आहे.सिद्धार्थ कलहंस सांगतात, "प्रियंका यांनी निवडणुकीच्या वेळी देखील सांगितलं होतं की त्या उत्तर प्रदेश सोडणार नाही, त्यामुळे असं दिसतं की त्या राज्य सोडणार नाही. त्यांना समजलं आहे की पक्ष संघटन मजबूत करणं आवश्यक आहे. पक्ष फारसं काही करण्याच्या स्थितीत नव्हता, तर निवडणुकीपूर्वी शांततेच्या काळात काय करायला हवं होतं, ते त्यांनी युद्धकाळात म्हणजे निवडणुकीपूर्वी संघटना मजबूत करण्याचं काम केलं आहे."त्यांच्या मते, "काँग्रेस पक्षाबद्दलची सहानुभूती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. पण मतं ही विश्वासानं येतात. त्या लोकांमध्ये राहिल्या असत्या तर कदाचित त्याचं मतांमध्ये रूपांतर झालं असतं. कारण लोकांच्या मनात अजूनही शंका आहे की 'यांना निवडणुकीत मतदान करा' आणि या नंतर आल्या नाही तर?"गेल्या काही वर्षांत प्रियंका गांधी राजकारणात फारशा सक्रिय नव्हत्या, असं जाणकारांचं मत आहे, परंतु आता त्यांना हे कळून चुकलं आहे की हे ज्यादा दिवस चालणार नाही. कारण 2024 मध्ये नरेंद्र मोदींना आव्हान द्यायचं असेल तर उत्तर प्रदेशात पक्षाला मजबुत करावंच लागेल. प्रत्येक आव्हानाला सामोरं जावं लागेल.