Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राहुल गांधी : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक गांधी कुटुंबाशिवायच होईल?

The events related to the election of the Congress President have started to gather pace
, शुक्रवार, 23 सप्टेंबर 2022 (10:56 IST)
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंबंधित घडामोडी वेग घेऊ लागल्या आहेत. त्यात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले आहेत की, राहुल गांधींचं मन वळवण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांना काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याची विनंती करेन.
 
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीतल्या पराभवाची जबाबदारी घेऊन राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी अंतरिम अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. पुढच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये काँग्रेसच्या नवीन अध्यक्षासाठी निवडणूक होणार आहे.
 
राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी बुधवारी (21 सप्टेंबर) सोनिया गांधींची भेट घेतली.
 
पीटीआय वृत्तसंस्थेच्या मते, अशोक गेहलोत कोचीला जाऊन राहुल गांधींच्या नेतृत्त्वातील 'भारत जोडो' यात्रेत सहभागी होतील आणि राहुल गांधींना आग्रह करतील की त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घ्यावी.
 
राहुल गांधींनी मात्र लोकसभा निवडणुकीनंतर राजीनामा देताना अध्यक्ष होणार नसल्याचं म्हटलं होतं.
 
अशोक गेहलोत यांच्याप्रमाणेच लोकसभेतले काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं आहे की, ते राहुल गांधींना भेटून पक्षाची जबाबदारी सांभाळण्याचा आग्रह करतील.
 
अनेक नेत्यांनी राहुल गांधीच काँग्रेस अध्यक्ष व्हावेत असा प्रस्ताव संमत केला आहे.
 
ज्येष्ठ पत्रकार स्मिता गुप्ता बऱ्याच काळापासून काँग्रेस पक्षाशी निगडित वार्तांकन करत आहेत. त्या म्हणतात की, "काही दिवसांआधी राहुल गांधी यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून अंदाज लावता येऊ शकतो की ज्या पद्धतीने राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष न होण्याबद्दल आधी ठाम होते. त्यांच्या वक्तव्यावरून ते अजूनही त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत असं वाटत नाही."
 
मात्र, ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांच्या मते राहुल गांधी त्यांचा निर्णय बदलण्याची शक्यता अतिशय कमी आहे.
 
त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की, राहुल गांधी 'भारत जोडो' यात्रा करत आहेत तर मग काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी नकार का देत आहेत?
 
 
रशीद किडवई म्हणतात, "राहुल गांधी देशाचे नेते तर होऊ इच्छितात. मात्र ते काँग्रेसचे नेते होऊ इच्छित नाहीत. कारण जेव्हा भारताचे मतदार नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून एखाद्या नेत्याला पाहतील तेव्हा ते काँग्रेस अध्यक्षाला पाहणार नाही. मात्र नेत्याला पाहतील. त्यामुळे राहुल गांधी देशाचे नेते म्हणून त्यांची प्रतिमा तयार करू इच्छितात काँग्रेस अध्यक्ष म्हणून नाही."
 
रशीद किडवई पुढे म्हणतात की, नेहरू पहिल्यांदा 1929 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1929 ते 1964 पर्यंत नेहरू काँग्रेसचे नेते आणि सर्वसामान्यांचे नेते राहिले. या काळात काँग्रेसचे अध्यक्ष ते फक्त सहा वेळा होते.
 
राहुल गांधी पण असाच विचार करतात की ते काँग्रेसचे नेते झाले नाहीत तरी सर्वसामान्यांचे नेते म्हणून राहतील.
 
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबद्दल स्मिता गुप्ता यांचं वेगळं मत आहे. त्यांच्या मते, या यात्रेचा उद्देश भाजपला आव्हान देणं नाही तर विरोधकांची मोळी घट्ट बांधण्याची कवायत आहे. त्यांच्या मते, ममता बॅनर्जी, नीतिश कुमार आणि अन्य विरोधी पक्ष नेते अजूनही राहुल गांधी यांना विरोधी पक्षाचा नेता मानण्यास तयार नाही. या यात्रेच्या माध्यमातून ते विरोधी पक्षाचा सगळ्यात मोठा चेहरा म्हणून स्वत:ला प्रस्थापित करू इच्छितात.
 
स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष
1948- 1949: पट्टाभि सीतारमैया
1950- पुरुषोत्तम दास टंडन
1951-1954: जवाहरलाल नेहरू
1955-1959- यूएन ढेबर
1959- इंदिरा गांधी
1960-1963 नीलम संजीव रेड्डी
1964-1965 के कामराज
1968-69 एस निजलिंगप्पा
1970-71- जगजीवन राम
1972-74- शंकर दयाळ शर्मा
1975-77- देवकांत बरुआ
1978-83- इंदिरा गांधी
1985-91- राजीव गांधी
1992-94- पीवी नरसिंह राव
1996-98- सीताराम केसरी
1998-2017- सोनिया गांधी
2017-2019- राहुल गांधी
2019- सोनिया गांधी (अंतरिम अध्यक्ष)
 
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचं आणखी एक कारण रशीद किडवई सांगतात.
 
रशीद किडवई यांच्या मते, आज जी-23 गट या नावाने जो गट ओळखला जातो, त्यांच्यापैकी बहुतांश लोकांनी नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये किंवा मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये सत्तापदं भोगली आहेत. मात्र 1989 पासून गांधी घराण्याचा एकही सदस्य पंतप्रधान झाला नाही किंवा कोणतंही मंत्रिपद भोगलं नाही.
 
असं असलं तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभवासाठी कायम गांधी कुटुंबियांना जबाबदार धरलं जातं.
 
रशीद किडवई सांगतात, "उत्तर प्रदेशात अजय कुमार लल्लू, पंजाबात सिद्धू आणि उत्तराखंडात हरीश रावत त्यांची सीट गमावून बसले मात्र त्याबद्दल त्यांना कोणीही जबाबदार धरलं जात नाही. राहुल गांधीना हे माहिती आहे आणि पराभवाची जबाबदारी इतरांनी घ्यावी असंही त्यांना वाटतं."
 
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी सध्या केरळमध्ये आहेत.
 
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी बुधवारी सांगितलं की राहुल गांधी 23 सप्टेंबरला दिल्लीत येतील. मात्र ते सोनिया गांधींना भेटायला येतील आणि त्यांचा काँग्रेसच्या अध्यक्षपदाशी काही घेणंदेणं नाही.
 
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 24 ते 30 सप्टेंबर या दरम्यान दिल्लीच्या पक्षाच्या मुख्यालयात नामांकन अर्ज भरले जातील आणि यादरम्यान राहुल गांधी या यात्रेत सहभागी होतील. काँग्रेल अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबर ला मतगणना होईल.
 
त्यामुळे राहुल गांधी अध्यक्षपदाची जबाबदारी घेणार नाहीत हेच त्यांनी एक प्रकारे सांगितलं आहे. सध्या या निवडणुकीचं वारं जोरात वाहू लागलं आहे, आणि त्यासाठी शशी थरूर आणि अशोक गेहलोत यांची नावं सध्या आघाडीवर आहेत.
 
लोकशाहीसाठी निवडणुका होणं हे चांगलं चिन्ह आहे असं वक्तव्य अशोक गेहलोत यांनी पीटीआयशी बोलताना केलं आहे.
 
त्याचवेळी एनडीटीव्हीशी बोलताना पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग म्हणाले, "मला तुम्ही स्पर्धेच्या बाहेर का पाहत आहात?"
 
गांधी कुटुंबीयांशिवाय निवडणुका?
अनेक वर्षानंतर काँग्रेस अध्यपदाची निवडणूक अशी आहे की ज्यात नेहरू गांधी कुटुंबाचा कोणताच सदस्य सहभागी होणार नाही.
 
1991 ते 1996 च्या मध्ये गांधी कुटुंबियांमधला कोणताच सदस्य या निवडणुकीत सहभागी नव्हता. मात्र त्यावेळी सोनिया गांधी राजकारणात सक्रिय नव्हत्या. राजकारणात आल्यावर 1998 मध्ये सोनिया गांधी यांनी सीताराम केसरी यांना हटवून काँग्रेस अध्यक्ष झाल्या होत्या.
 
2000 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. तेव्हा सोनिया गांधी यांना आवाहन देण्यासाठी समोर जितीन प्रसाद होते. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना 7542 मतांपैकी फक्त 94 मतं मिळाली होती.
 
सोनिया गांधी 2017 पर्यंत अध्यक्ष होत्या. त्यानंतर राहुल गांधी यांनी ही जबाबदारी सांभाळली. 2019 नंतर सोनिया गांधी अंतरिम अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
 
राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यावर म्हणाले होते की गांधी कुटुंबाच्या कोणत्याच सदस्याने काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर प्रभाव टाकू नये.
 
सोमवारी शशी थरूर यांनी आणि बुधवारी अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधींची भेट घेतली. या बैठकीत काय झालं याची माहिती मिळाली नाही. सूत्रांच्या हवाल्याने सांगायचं झालं तर सोनिया गांधी म्हणाल्यात की निवडणुकीत ते कोणाचीच बाजू घेणार नाही.
 
रशीद किडवईच्या मते, राहुल गांधी यांनी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांना तयार केलं आहे की यावेळी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गांधी कुटुंबीय पूर्णपणे वेगळे राहतील आणि दूर राहतील.
 
रशीद किडवई यांच्या मते याआधी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातून गांधी कुटंबीयांच्या एखाद्या सदस्याप्रति निष्ठा दाखवणारे प्रस्ताव संमत होत असत. मात्र यावेळी एक एक दोन प्रस्ताव संमत होत आहेत.हे सगळं आधीच ठरलेलं आहे असं वाटत नाही.
 
स्मिता गुप्ता म्हणतात की शशी थरूर आणि सोनिया गांधी यांच्या भेटीत काय झालं हे सांगणं खरंच कठीण आहे. त्यांच्या मते सोनिया यांनी शशी थरूर यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं की तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे हे सांगणं कठीण आहे कारण या दोन्ही स्थितीत खूप फरक आहे.
 
स्मिता गुप्ता यांच्या मते गांधी कुटुंबीयांनी कितीही दूर राहण्याचा प्रयत्न केला तरी अशोक गेहलोत यांनी निवडणूक लढवली तर ते गांधी परिवाराचे उमेदवार आहे असा संदेश जाईल.
 
स्मिता गुप्ता सांगतात की काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फक्त खासदार आणि आमदार नसतात पण हजारो डेलिगेट्स असतात. त्यांच्यापैकी बहुतांश लोकांची निष्ठा गांधी कुटुंबियांबरोबर आहे.
 
त्या म्हणतात, "या निवडणुकीत अशोक गेहलोत यांची स्थिती बरी दिसतेय आणि त्यांनी निवडणूक जिंकली तर अप्रत्यक्षपणे राहुल गांधीच पक्ष चालवतील."
 
मात्र, रशीद किडवई सांगतात की ही निवडणूक ऐतिहासिक होईल आणि 17 ऑक्टोबर नंतर काँग्रेसचं अंतर्गत राजकारण आजच्यापेक्षा वेगळं असेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुरादाबादमधील घृणास्पद घटना, अल्पवयीन तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, नग्नावस्थेत घरी पोहोचली तरुणी