डेहराडून. उत्तराखंडमधील पौरी गढवाल येथे झालेल्या एका रस्ते अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, काल रात्री पौरी गढवाल जिल्ह्यातील धूमकोट येथे झालेल्या बस अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे.
पोलीस आणि एसडीआरएफच्या टीमने 21 जणांची सुखरूप सुटका केली आहे. अपघातात जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये जवळपास 50 लोक होते.
नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास हा अपघात झाला. स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे, मात्र अंधारामुळे बचाव कार्य करणाऱ्यांना अडचणी येत आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघाताच्या ठिकाणी कोणतीही दिवाबत्ती नव्हती आणि गावातील रहिवासी त्यांच्या मोबाईलच्या फ्लॅशलाइटच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते.
दरम्यान, अधिकारी अपघातस्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिका, जीवरक्षक उपकरणे पाठवण्यात आली असून बचाव कार्यासाठी प्रकाश व्यवस्थाही करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी डेहराडून येथील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कार्यालयाला भेट देऊन पौरी येथील बस अपघातानंतर परिस्थितीचा आढावा घेतला.