Samudrayaan Mission: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 यशस्वीपणे उतरवून भारताने इतिहास रचला आहे. यानंतर अवघ्या एका आठवड्यानंतर भारताने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी मोहीम सुरू केली. ही भारताची पहिली सूर्य मोहीम आहे. यानंतर भारत आता समुद्राची खोली मोजणार असून समुद्राच्या आत दडलेले रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. भारत लवकरच आपल्या समुद्रयान मोहिमेच्या चाचण्या सुरू करणार आहे.
मिशन समुद्रयानमध्ये तीन लोकांना स्वदेशी पाणबुडीत 6 किलोमीटर खोलीपर्यंत पाठवले जाईल. जेणेकरून तेथील स्रोत आणि जैवविविधतेचा अभ्यास करता येईल. मत्स्य 6000 असे या जहाजाचे नाव आहे. याद्वारे कोबाल्ट, निकेल आणि मॅंगनीज या मौल्यवान धातूंचा समुद्रसपाटीपासून 6 किलोमीटर खाली शोध घेतला जाईल. केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी पुढील मोहीम समुद्रयान असल्याची माहिती दिली.
मत्स्य 6000 सुमारे दोन वर्षांत बांधले गेले. पुढील वर्षी म्हणजेच 2024 च्या सुरुवातीला चेन्नईच्या किनाऱ्यावरून बंगालच्या उपसागरात चाचणीसाठी सोडले जाईल. समुद्रात 6 किलोमीटर खोलीवर जाणे आव्हानांनी भरलेले असते. या वर्षी जूनमध्ये झालेल्या टायटनच्या दुर्घटनेची भारतीय शास्त्रज्ञांनाही जाणीव आहे. या सबमर्सिबलमध्ये पर्यटकांना समुद्रात टायटॅनिकच्या अवशेषाकडे नेत असताना स्फोट झाला. हे पाहता भारतीय शास्त्रज्ञ मत्स्य 6000 च्या डिझाइनचे वारंवार परीक्षण करत आहेत.
समुद्रयान हा पूर्णपणे स्वदेशी प्रकल्प आहे. मत्स्य 6000 हे एक सबमर्सिबल आहे जे टायटॅनियम मिश्र धातु वापरून बनवले गेले आहे. ते समुद्रसपाटीच्या दाबापेक्षा 600 पट जास्त दाब सहन करू शकते म्हणजेच 600 बार (दाब मोजण्याचे एकक) 6000 मीटर खोलीवर. सबमर्सिबलचा व्यास 2.1 मीटर आहे. याद्वारे तीन लोकांना 12 तासांसाठी 6000 मीटर खोलीवर समुद्रात पाठवले जाईल. यात 96 तासांची आपत्कालीन सहनशक्ती आहे. 2026 मध्ये हे मिशन सुरू होईल अशी अपेक्षा आहे. अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स आणि चीननंतर मानवयुक्त सबमर्सिबल तयार करणारा भारत हा सहावा देश आहे.
हे जहाज समुद्राच्या खोलीचा शोध घेईल. यासोबतच पाणबुडीद्वारे मानवाला समुद्राच्या खोलीतील दुर्मिळ खनिजांच्या खाणीत पाठवणे हाही त्याचा उद्देश आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे 4100 कोटी रुपये आहे. खोल समुद्रातील गॅस हायड्रेट्स, पॉलिमेटॅलिक मॅंगनीज नोड्यूल, हायड्रो-थर्मल सल्फाइड आणि कोबाल्ट क्रस्ट यांसारख्या संसाधनांचा शोध घेण्यासाठी समुद्रयान पाठवले जाईल. या वस्तू 1000 ते 5500 मीटर खोलीवर आढळतात.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने जून 2021 मध्ये ही मोहीम सुरू केली. त्याचा उद्देश सागरी संसाधनांची माहिती घेणे हा आहे. सागरी संसाधनांचा वापर करण्यासाठी खोल समुद्रात तंत्रज्ञान पाठवणे. ब्लू इकॉनॉमीमध्ये भारत सरकारला मदत करणे हा त्याचा उद्देश आहे. समुद्रयान याचाच एक भाग आहे.