नवी मुंबई कोयना धरण प्रकल्पग्रस्तांना मिळालेली २४ एकर जमीन कवडीमोल दराने बिल्डरला आंदण दिल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. या भूखंडाची किमंत बाजारभावाप्रमाणे १ हजार ६०० कोटी असून केवळ ३ कोटी रुपयांना ती बिल्डरच्या घशात घातली गेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वरदहस्ताशिवाय आणि मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांची मदत हे शक्य नसल्याचा आरोप काँग्रेसतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आला. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाल आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील उपस्थित होते. सरकारतर्फे कोयना धरण प्रकल्पग्रस्त असलेल्या आठ कुटुंबाना ही जमीन दिली होती. या जमीनीचा व्यवहार झाला असून १६०० कोटी किमंत असलेल्या या जमीनीची विक्री प्रति एकर १५ लाख रुपयांनी करण्यात आली. एका दिवसातच जमीनीच्या नावामध्ये फेरबदल करणे, पॉवर ऑफ एटर्नी नावावर करणे अशा सर्व गोष्टी एका दिवसांत पार पडलेल्या आहेत. सिडको आणि संबंधित तहसीलदार कार्यालयाने एका दिवसांत सर्व कार्यवाही कशी काय पूर्ण केली? असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.