साई बाबा यांच्या जन्मभूमीचा मुद्दा निकाली काढण्यासाठी रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी शनिवारी सायंकाळी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भाविकांचे हाल टाळण्यासाठी दोन दिवस अगोदर निर्णय जाहीर करण्यात आला आहे. शिर्डीच्या इतिहासात प्रथमच शिर्डी बेमुदत बंद राहणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साईच्या जन्मस्थळासाठी १०० कोटींचा विकास आराखडा राबवला जाईल, अशी घोषणा मागील आठवड्यात केली होती. त्याचे तीव्र पडसाद शिर्डी व भाविकांमध्ये उमटले आहेत. पाथरीला निधी देण्यास शिर्डीकरांची मुळीच हरकत नाही. मात्र साई जन्मस्थान म्हणून त्याची ओळख निर्माण केली जाते याला शिर्डीकरांचा आक्षेप आहे. जन्मस्थळाच्या वादामुळे बाबांच्या मूळ शिकवणुकीला व प्रतिमेलाच धक्का पोहचणार असल्याने शिर्डीकरांचा जन्मस्थानाच्या दाव्याला आक्षेप आहे.